* तीन दिवसांत एकही वाहन पोहोचले नाही
* शिक्षण अधिकाऱ्यांसह एक हजार वाहनधारकांना नोटीस
प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), नागपूर शहर कार्यालयाच्या वतीने १ मे ते ५ जूनदरम्यान शहरातील प्रत्येक स्कूलबसची तपासणी केली जाणार होती. परंतु गेल्या तीन दिवसांत एकही वाहन तपासणीकरिता ‘आरटीओ’त आले नाही. स्कूलबस धारकांनी तपासणीकडे पाठ दाखवल्याने ‘आरटीओ’च्या वतीने मंगळवारी शिक्षण अधिकाऱ्यांसह सुमारे एक हजार स्कूलबस धारकांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात हजारो स्कूलबस, स्कूलव्हॅन्समध्ये लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. या वाहनांचे काही वर्षांपूर्वी वाढलेले अपघात बघता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने कडक कायदे केले होते. त्यानुसार राज्यातील स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षांमध्ये आवश्यक बाबींची एक मार्गदर्शक सूचना जारी करून तातडीने सगळ्या वाहनांमध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या वाहनांमध्ये अग्निशामन यंत्रणा, त्यांचा रंग, त्यामध्ये काही अनुचित घडल्यास त्वरित बाहेर पडण्याकरिता आवश्यक असलेली आपातकालीन खिडकी, विद्यार्थ्यांना पकडण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या दांडासह इतर बाबींचा समावेश होता.
नियमानुसार या वाहनात विद्यार्थ्यांना सांभाळण्याकरीता एक वाहक, वाहनात विद्यार्थिनी असल्यास महिला वाहकांसह इतरही अनेक बाबींचा सहभाग केला गेला होता. या कायद्याचे पालन करण्याकरिता वारंवार शासनाकडून वाहनधारकांना सूचना केल्या. परंतु त्याकडे अनेक स्कूलबस चालकांनी दुर्लक्ष केले. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात न्यायालयाने आदेश दिल्याने नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून १ मे ते ५ जूनदरम्यान शहरातील सगळ्याच स्कूलबस, व्हॅनची कसून तपासणी करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले.
उन्हाळी सुट्टी असल्याने या काळात तपासणी केल्यास विद्यार्थ्यांना त्रास होणार नसल्याचा दावा याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गाप्पा पवार यांनी केला होता. ही माहिती शहरातील सगळ्या शाळांसह त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहन धारकांना देत ती निशुल्क असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून एकही वाहन नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहचले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. वाहनधारक आले नसल्याचे बघत मंगळवारी शिक्षण अधिकारांसह शहरातील शहर आणि पूर्व नागपूर आरटीओच्या आखत्यारीत येणाऱ्या सुमारे एक हजार स्कूलबस, स्कूलव्हॅन धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

स्कूलबस संघटनेसोबत लवकरच बैठक
नागपूर शहरातील सुमारे एक हजार स्कूलबस, स्कूलव्हॅनची तपासणी वेळेत केली जाईल. यावर लवकरच स्कूलबस चालकांच्या संघटनांसोबत बैठक आयोजित केली गेली असून तपासणीकरिता त्यांना पत्रही पाठवले आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ‘आरटीओ’ची असून ती निश्चित पूर्ण केली जाईल.
रवींद्र भूयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर