स्कूलबस चालकांना वारंवार फिटनेस प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन केल्यावरही त्यांनी दुर्लक्ष केल्याने शहर प्रादेशिक परिवहन विभागाकडून २९६ स्कूलबस व स्कूलव्हॅनचे परवाने निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही ग्रामीणच्या स्कूलबस चालकांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही तब्बल ६०० स्कूलबस व स्कूलव्हॅनचे परवाने निलंबित केले. या कारवाईने सगळ्याच स्कूलबस चालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना सुरक्षित शाळेत पाठवायचे कसे? ही चिंता पडली आहे.

नागपूर शहरात १,९१८ तर ग्रामीण भागात सुमारे १ हजार २०० वर ‘स्कूलबस, स्कूलव्हॅन्स’मध्ये लाखो शालेय विद्यार्थ्यांची ने-आण होते. या वाहनांचे वाढते अपघात बघता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने कडक कायदे केले. अंमलबजावणीकरिता स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षांमध्ये आवश्यक बाबींची एक मार्गदर्शक सूचना जारी झाली. त्यानुसार स्कूबसमध्ये अग्निशमन यंत्रणा, त्यांचा रंग, त्यात काही अनुचित घडल्यास त्वरित बाहेर पडण्याकरिता आवश्यक असलेली आपात्कालीन खिडकी, विद्यार्थ्यांना पकडण्याकरिता विशिष्ट प्रकारचा दांडा, विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी एक वाहक, वाहनात विद्यार्थिनी असल्यास महिला वाहकांसह इतरही अनेक बदलांचा समावेश होता.

या दुरुस्तीकडे बहुतांश चालकांनी दुर्लक्ष केले. राज्याच्या परिवहन आयुक्तांसह सगळ्याच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्कूलबस चालकांना विविध नोटीस पाठवत वेळोवेळी फिटनेस तपासणीचे आव्हानही केले.

त्यानंतरही चालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता कडक कारवाई सुरू केली होती. त्यानुसार नागपूर शहरातील २९६ स्कूलबसचे परवाने ४ महिन्यांसाठी निलंबित तर पूर्व नागपुरातील तीनशेवर स्कूलबस चालकांना निलंबनाची अंतिम नोटीस देण्यात आली होती. ही कारवाई ताजी असतानाच ग्रामीण प्रादेशिक कार्यालयाकडूनही सुमारे ६०० स्कूलबस व व्हॅनचे परवाने निलंबित करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून परिवहन विभागाकडून काळजी घेतली जात असून वेळोवेळी स्कूलबसची फिटनेस तपासणी केली जाते. प्रशासनाने वारंवार आव्हान करूनही स्कूलबस चालक प्रतिसाद देत नसल्याने परिवहन विभागाला नाईलाजाने कायद्यानुसार स्कूलबसचे परवाने निलंबित करावे लागले.  – शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

untitled-32