मंगेश राऊत

नियमांची अंमलबजावणी करणारी समिती झोपेत; पालकांच्या तक्रारींकडे अक्षम्य डोळेझाक

विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत सोडण्यासाठी व परत आणण्यासाठी शहरभर स्कूलबस धावत असतात. स्कूलबस ही सुरक्षित वाहतुकीचा पर्याय असल्याने पालकांनी खरे तर चिंतामुक्त व्हायला हवे, परंतु आपल्या पाल्याला स्कूलबसमध्ये बसवण्यापासून तर तो परत येईपर्यंत पालकांच्या जीवात जीव नसतो. याचे कारण, या स्कूलबसचा अफाट वेग हे आहे. शहारातल्या गल्लीबोळातून बेफाम धावणाऱ्या स्कूलबसेस बघितल्या की पालकांच्या अंगावर काटा येतो. स्कूलबसेसच्या या बेफाम वेगावर प्रतिबंध आणण्यासाठी स्वतंत्र विद्यार्थी वाहतूक धोरण आहे, या धोरणाच्या योग्य अंमलबजावणीसाठी समितीही आहे, परंतु सारेच झोपेचे सोंग घेऊन बसले असल्याने हजारो विद्यार्थ्यांना रोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

९ जानेवारी २०१२ रोजी उपराजधानीत स्कूलबसमधून उतरताना विरथ झाडे या मुलाचा स्कूलबसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. त्या प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेतली व राज्य सरकारला या संदर्भात वेळोवळी आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण तयार केले. नियम आखून दिले. या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व शहर स्तरावरील मुख्य समितीबरोबरच शालेय स्तरावर प्रत्येकी एक समिती स्थापन करण्याचे ठरले. या समितीलाच बसचे भाडे व थांबे ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, अनेक शाळांनी समित्या स्थापन केल्या असल्या तरी त्या केवळ दाखवण्यासाठीच असल्याने त्यांचे काम कागदावरच राहिले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी या समितीचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. दुसरीकडे स्कूलबस नियमावलीनुसारच धावते का, हे शोधण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही कायमची व ठोस उपाययोजना नाही. त्याशिवाय स्कूलबसही प्रतितास ४० किमी वेगाने धावावी, असाही नियम आहे. पण, स्कूलबसचे चालक नियम धाब्यावर बसवून यापेक्षा प्रचंड वेगाने स्कूलबस चालवत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या आहेत. काही वेळेला कारवाई होते व पुन्हा जैसे थे होऊन जाते. म्हणूनच नियमबा’ पद्धतीने स्कूलबस चालवणाऱ्यांचे फावत आहे.

वेळ पाळण्यासाठी वेगाचा थरार

अनेकदा विद्यार्थी २० ते २५ किमी अंतरावरून शाळेत पोहोचतात. अशा मुलांना घेण्यासाठी गेलेल्या स्कूलबसचे चालक ठिकठिकाणी थांबतात. पालकही मुलांना घेऊन वेळेवर स्थानकावर पोहोचत नसल्याने बसचालकाला प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बराच वेळ वाट पाहण्यात जातो. गेलेल्या वेळेचे नियोजन करण्यासाठी चालक मग जोरात बस दामटतात.

हे बंधनकारक

शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव,बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, प्रथमोपचार पेटी, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती तसेच विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी महिला सहायकाची नेमणूक करणे बंधनकारक आहे.

म्हणून विद्यार्थी थकतात

अनेक नामांकित शाळा शहराबाहेर आहेत. या शाळेत पोहोचण्यासाठी  २० ते २५ किमीचा प्रवास करावा लागतो. यासाठी किमान दीड ते दोन तास लागतात. दोन तास जाणे व दोन तास परत येणे, अशाप्रकारे मुलांना बसमध्येच तीन ते चार तास घालवावे लागतात. त्यामुळे ते अधिक थकतात. याचा परिणाम त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्यावर होतो. परिणामी बसचालकाला प्रतीक्षा करावी लागते.

वाहतूक कोंडीमुळेही बसला उशीर

शाळेचा वेळा आणि बसचे थांबेही निश्चित आहेत. पालकांनी थांब्यावर वेळेत मुलांना आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. थांब्यावर उशिरा येणाऱ्यांसाठी बस न थांबवण्याच्या सूचना चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे क्वचितच एखादी बस उशिरा शाळेत पोहोचते. उशीर झाल्यास चालकांना जाब विचारण्यात येतो. अनेकदा वाहतूक कोंडीमुळेही बसला उशीर होत असतो.

– भारती बिजवे, प्राचार्य सांदीपनी स्कूल