शहरातील अनेक शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाची परवानगी असताना ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा व्यवसाय शाळांनी सुरू केला असून यापासून शिक्षण विभाग अद्यापही अनभिज्ञ आहे.
महालवरील एका अनुदानित शाळेत तसेच मेडिकल चौकातील एका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याने पालकाकंडून ५०० रुपये लाटले जात असून त्या बदल्यात ‘सीबीएसई’ची पुस्तके देण्यात येत आहेत. आजच्या पालकांना मराठी शाळेत तर प्रवेश नकोतच पण, त्यांना निमइंग्रजी शाळाही नको आहेत. त्यांना हव्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा. मात्र, कॉन्व्हेंटचे शुल्क जास्त असल्याने ते त्याही ठिकाणी पाल्याला घालू शकत नाहीत. पालकांची मानसिकता ओळखून राज्य मंडळाची परवानगी असलेल्या शाळा ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम शिकवतो अशी बतावणी करीत सुटल्या आहेत. पालकांकडून ५०० रुपये घेऊन विज्ञान आणि गणिताची पुस्तके हातात दिली जात आहेत. त्यामुळे पालकही खुशीत आहेत.
‘वर्ग पाचवीत प्रवेश देणे सुरू आहे. मराठी लोअर इंग्लिश वर्ग ५ ते ७ गणित आणि विज्ञान सी.बी.एस.ई. पॅटर्न’ असे मोठय़ा अक्षरात लिहून प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्यावर्षीपासून हे प्रवेश सुरू असून काहीही आक्षेप न आल्याने याहीवर्षी तीच प्रक्रिया राबवली जात आहे. शाळेत प्रवेश मिळवण्यासाठीचा हा फंडा इतर शिक्षण संचालकांसाठी मात्र, फारच तापदायक ठरत असून त्यांच्या प्रवेशावर परिणाम होत असल्याने इतर शाळांचे शिक्षण संचालकही जाम वैतागले आहेत. मात्र, अशा प्रकारची ही निव्वळ फसवणूक असून हीच मुले आणि त्यांचे पालक दहावीपर्यंत ‘सीबीएसई’ शिकतो याच मानसिकतेत राहतील की पाल्य ‘सीबीएसई’मध्ये शिकतोय, पण नंतर त्यांना चांगलाच झटका बसेल, अशी भीती संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे. महालवरच्या त्या शाळेतील बहुतेक मुले गोळीबार चौक, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूजवळच्या भागातील आहेत. इंग्रजी शिक्षणाचा फारसा गंध नसलेले पालक सीबीएसई शब्दानेच हुरळून गेल्याने त्याचेच भांडवल शाळा व कनिष्ठ महाविद्यालये करताना दिसत आहेत. याविषयात लक्ष घालण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे.

’ शाळांची खुलेआम मनमानी
’ शिक्षण विभाग अनभिज्ञ

शहानिशा करावी लागेल
जर शाळेला राज्य मंडळाची मान्यता असेल तर शाळांना तोच अभ्यासक्रम शिकवावा लागेल. पण शाळा तसे न करता ‘सीबीएसई’चे अभ्यासक्रम परस्पर सुरू करून शिकवत असतील तर त्याची शहानिशा करावी लागेल.
– ओमप्रकाश गुढे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

श्वास व त्वचेच्या आजाराला आमंत्रण
सर्वात पहिली बाब म्हणजे मुलांना या उद्योगात आणणे चुकीचे आहे. कचऱ्यामुळे कोवळ्या जीवाला लवकर आजार होण्याची शक्यता असते. कचऱ्यातील अनेक रासायनिक घटकांमुळे शरीरसंस्था तसेच फुफुस, मेंदू, मूत्रिपड, त्वचा या महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होतो. श्वास व त्वचेचे आजार लवकर होतात. शिवाय तोंडाला कापड आणि हातात मोजे घातल्याशिवाय कोणीही कचरा उद्योगात काम करू नये. मुलांनी या उद्योगात काम करणे म्हणजे आजाराला आमंत्रण देणे आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ