एन-कॉप्स एक्सलंसतर्फे उन्हाळी शिबीर

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, चांगले व वाईट यामधील फरक कळावा, एक संस्कारी पिढी घडवावी, या उद्देशातून नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘समर कॅम्प’ आयोजित करून शाळेकरी मुलांना क्रीडा, मनोरंजन आदी बाबींसह पोलिसांची शिस्त व संस्कार शिकविण्यात येणार आहे.

विविध गुन्ह्य़ांमध्ये दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग दिसून येतो. यात अंमली पदार्थाची तस्करी, घरफोडी, चोरी, वाहन चोरी, सोनसाखेळी चोर आदींचा समावेश आहे. याशिवाय खून व बलात्काराच्या गंभीर गुन्ह्य़ांतही अल्पवयीन मुले आरोपी असतात. ही समाजासाठी अतिशय धोकादायक बाब आहे. शिवाय लोकांमध्ये वाहतूक नियम सर्रासपणे तोडण्याची स्पर्धा लागली असते. अशावेळी प्रौढ व्यक्तींना शिकविण्यापेक्षा लहान मुलांना शिस्त, संस्कार, नियम, कायदे आदीचे लहानपणापासून शिक्षण दिल्यास भविष्यातील पिढी चांगली निर्माण होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना आहे. या उद्देशातून ‘एन-कॉप्स एक्सलंस’ अंतर्गत १२ ते १७ वष्रे वयोगटातील मुलांसाठी ‘समर कॅम्प’चे आयोजित करण्यात येत आहे. १५ ते २२ मे दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मुलांकरिता हा ‘समर कॅम्प’ असेल. तर २३ ते ३० मे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांची मुलांकरिता ‘कॅम्प’ घेण्यात येईल. सकाळी ५.३० ते ११ या कालावधीमध्ये हा ‘कॅम्प’ असेल.

झोपडपट्टीतील मुलांना मोफत प्रवेश

या उन्हाळी शिबिराकरिता प्रति विद्यार्थी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यात प्रशिक्षित मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन व प्रात्यक्षिक होतील. शिवाय मध्यतरांमध्ये मुलांना पौष्टिक अल्पोपहार पुरविला जाईल. झोपडपट्टीतील मुलांना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल .

कल्पना धवने, संचालक, एन-कॉप्स एक्सलंस