शिक्षणाच्या प्रश्नांवर दोन वेळा कामकाज तहकूब

शिक्षण, शिक्षकांचा प्रश्न विधान परिषदेत गाजला, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अपक्ष सदस्य कपिल पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगीही झाली. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.

प्रश्नोत्तराच्या तासाला आज शिक्षक, शाळा, विनाअनुदानावरील शाळांचा मुद्दा अनुक्रमे डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील, नागो गाणार यांच्यासह इतरही सदस्यांनी उपस्थित केला. राज्यातील १३०० शाळा बंद करून राज्य सरकार राज्यातील शैक्षणिक व्यवस्थाच नष्ट करण्याच्या मार्गावर निघाले, असा आरोप केला.

२० टक्के अनुदान दिलेल्या शाळांचा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या यादी जाहीर करण्याचा मुद्दाही सदस्यांनी मांडला. या सर्व प्रश्नांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर देताना विरोधी पक्षाला चिमटेही घेतले. अनुदानाचा प्रश्न आघाडी सरकारच्या काळातीलच आहे.

युती सरकारनेच प्रथम त्यांना २० टक्के अनुदान दिले, टप्प्याटप्प्याने त्यांना अनुदान दिले जाईल, संस्थाचालक शिक्षकांकडून पैसे घेतात. त्यामुळे निधीची तरतूद झाल्यावरच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची यादीही जाहीर करा, अशी विनंती शिक्षक आमदारांनीच केल्याचे तावडे यांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी आक्षेप घेतला. यावर तावडे यांनी याबाबतच्या त्यांच्या डायरीतील नोंदी पटलावर ठेवण्याची तयारी दाखवली.

दरम्यान, शिक्षकांच्या प्रस्तावावर चर्चेची मागणी करताना तावडे यांना लक्ष्य केले. फुले, आंबेडकर यांनी राज्याचा शैक्षणिक पाया भक्कम केला. पुढे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी त्यात भर घातली. त्यामुळेच आम्ही त्यांचे नाव घेतो, पण शिक्षणमंत्र्यांना ते खपत नाही. शेतकऱ्यानंतर सर्वाधिक त्रस्त शिक्षक आहेत. शाळा बंद पडल्याने शिक्षक बेरोजगार होत आहे, शिक्षण हक्क कायद्यानुसार असे करता येत नाही, ऑनलाईन प्रक्रियेत घोटाळे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पाटील यांचे आरोप खोटे -तावडे

शाळा बंद केल्या नाहीत, तर पटसंख्या कमी झाल्यामुळे  एक कि.मी. परिसरात स्थानांतरित केल्या आहे. त्यामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. चार मुले एका शाळेत असतील तर त्या बंद करणार नाही का? असा सवाल करीत त्यांनी पाटील खोटे बोलत असल्याचा आरोप केला. फुले, शाहू, आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गानेच शिक्षणाचे काम आम्ही करीत आहोत, असे तावडे म्हणाले.