व्यवस्थापनाकडून शाळेतून काढण्याची धमकी देण्याचा प्रकार

खासगी शाळा व्यवस्थापनाकडून होणारी लूट मुकाटय़ाने सहन करणाऱ्या पालकांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे. लुटीविरोधात आवाज उठविल्यास पाल्यालाच शाळेतून काढण्याची धमकी दिली जात असल्याने सर्व प्रकार सहन करण्याशिवाय पर्याय नसतो, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी त्यांची नावे जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

खासगी शाळांमधून पालकांची होणारी लूट याबाबत लोकसत्ताने चालविलेल्या वृत्तमालिकेवर विविध शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी शांळाविरुद्ध संताप व्यक्त केला. पूर्व नागपुरातील एका खासगी इंग्रजी शाळेतील मुलाचे पालक म्हणाले की, निकाल जाहीर झाल्यावर पालकांच्या हाती पुस्तकांसह इतर साहित्याची यादी दिली जाते. ठराविक दुकानातून ते खरेदी करण्यास सांगितले जाते. शाळेला २० हजार रुपये देणगी दिल्यावर दरवर्षी इमारत फंड वसूल केला जातो. शिवाय दरवर्षी वाढीव शुल्क घेतले जाते. शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी विशेषत: स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य, वेगवेगळे पोशाख बाहेरून मागविले जातात. त्याचा खर्च पालकांकडून वसूल केला जातो.

नंदनवन भागातील एका ‘कॉन्व्हेट’मध्ये मुलगा आठवीला आहे. पुस्तक, गणवेश आणि इतर साहित्यासाठी ४ ते ५ हजार शुल्क आकारले जाते. दर महिन्यात होणाऱ्या सभेत पालक वाढीव शुल्कबाबत बोलतात, त्यावेळी ‘मुलांची फी देऊ शकत नसाल तर दुसऱ्या शाळेत टाका’ असे व्यवस्थापकांकडून सांगितले जाते.

कोराडी मार्गावरील खासगी इंग्रजी शाळेतील मुलीच्या आई म्हणाल्या की, दरवर्षी शाळेला वाढीव शुल्क द्यावे लागते.

शाळेच्या बस ठरलेल्या आहेत. त्या बसने विद्यार्थ्यांना पाठवावे लागते. खासगी वाहनाने मुलाला शाळेत सोडण्याची व्यवस्था केली तर शाळेला ते चालत नाही. पुस्तक आणि गणवेश सुद्धा विशिष्ट दुकानातून घेण्यासंदर्भात सक्ती केली जाते. सेमीनरी हिल्सजवळील खासगी इंग्रजी शाळेतही असाच प्रकार आहे. तेथील एक पालक म्हणाले की, या शाळेत माझे दोन्ही मुले असून त्यातील एक सहावीला आणि दुसरा आठवीला आहे. शाळेत विविध उपक्रमासाठी दर महिन्यात मुलांकडून पैशाची मागणी केली जाते. पैसे वेळेत पाठविले नाही तर पालकांच्या नावाने चिठ्ठी पाठवतात. साहित्य, गणवेश विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती आहेच. तेथे हे सर्व साहित्य वाढीव दराने विकले जाते.

पालक सभेचा फार्स

बहुतांश शाळांमध्ये पालक सभा घेतली जाते. पालकांची शाळेकडून काय अपेक्षा आहे, काही सूचना आणि तक्रारी असेल तर त्यावर चर्चा आणि निराकरण हा या सभेचा उद्देश असतो. प्रत्यक्षात शुल्क आकारणीचा विषय अपवादात्मक स्थितीतच येथे चर्चेला जातो. पालकांनी उपस्थित केला तरी त्याला बगल दिली जाते. पालकांनी आग्रही भूमिका घेतल्यास त्यांना इतर शाळेत मुलांना टाका असे स्पष्ट शब्दात सांगितले जाते. त्यामुळे पालकही बोलत नाहीत. शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. पालकच स्वत:हून मुलांना या शाळेत टाकण्यासाठी आग्रही असतात, प्रसंगी ते देणगीही देतात, त्यामुळे व्यवस्थापनाचे फावते.