जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

नागपूर : करोना संसर्ग कमी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वर्ग पाच ते आठपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गुरुवारी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वीच ही घोषणा केली होती. पण अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक  प्रशासनाला दिले होते. यासंदर्भात कुंभेजकर यांना विचारले असता त्यांनी शासनाने दिलेल्या आदेशानुसार २७ पासून जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होतील, असे स्पष्ट केले.

९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले असून जिल्ह्यात कोणत्याही शाळेतून कुठलीही  तक्रार प्राप्त झाली नाही,  शाळेत येण्याचा निर्णय हा ऐच्छिक  असणार आहे. शाळेत करोनाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ९ वी ते १२ वर्गातील पटसंख्या ग्रामीण भागात३५ टक्के तर शहरात २० टक्के आहे. ऑनलाईन शाळा ग्रामीम भागात घेणे अवघड आहे. अनेक वेळा नेटवर्कची समस्या असते. गरिबीमुळे मुलांकडे मोबाईल नसतो. त्याचा विद्यार्थ्यांना बसतो. अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणे आवश्यक आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले.

प्रजासत्ताक दिन साधेपणाने

करोनामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सोहोळ्याचा मुख्य कार्यक्रम  अत्यंत साधेपणाने साजरा केला जाईल. कस्तुरचंद  पार्कवर विद्यार्थ्यांना बोलावण्यात येणार नाही. परेडही होणार नाही. करोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच हा कार्यक्रम होईल, असे जिल्हाधकारी रवींद्र ठाकरे म्हणाले.

लसीकरणाचा प्रतिसाद वाढेल – जिल्हाधिकारी

करोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात काही गैरसमज आहेत. ते दूर झाल्यावर लसीकरण मोहिमेला टप्प्याटप्प्याने प्रतिसाद वाढेल, तो वाढावा म्हणून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.