नागपूर : संगणक यंत्रणेच्या सहाय्याने ठिकठिकाणच्या वायू प्रदूषणाचा अंदाज बांधणे कठीण आहे. नमुन्याची किंमत, ठिकाणांची आणि निरीक्षण तज्ज्ञांची अनुपलब्धता हे देखील अनेकदा हवेच्या गुणवत्ता निरीक्षणात अडथळे म्हणून उभे राहू शकतात. मात्र, नीरीच्या शास्त्रज्ञांनी कोणत्याही अडथळ्याविना विविध उंची आणि ठिकाणांवरील हवा गुणवत्ता मोजणारी ‘नीरी-क्षण-एक्यू’ यंत्रणा विकसित केली आहे.

या नव्या यंत्रणेतील ‘मल्टी-रोटर’ यूएव्ही तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय सेन्सर यामुळे आकाशातील अडथळ्यांसह शहरी वातावरणातील गर्दीतसुद्धा ‘झेड एक्सिस’ लंबरेषेतील डेटा मिळेल. नीरीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या यंत्रणेमुळे शहराच्या विविध भागातील उंच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना  वायु प्रदूषणाच्या धोक्याची माहिती मिळू शकेल. वायू प्रदूषण किंवा हवा गुणवत्ता मोजण्याच्या पूर्वीच्या पद्धतीपेक्षा ही नवीन युएव्ही आधरित पद्धत अधिक सोपी आणि व्यवहार्य आहे.

सीएसआयआर-नीरीच्या शास्त्रज्ञांनी व्यावसायिक ड्रोनवर हा एक प्रयोग विकसित केला आहे. यात अतिशय कमी वजनाचे सेन्सर लावण्यात आले आहेत. गरज आणि क्षमतेनुसार विविध सेन्सर या ड्रोनला जोडले जाऊ शकतात. ही यंत्रणा शहरी आणि ग्रामीण भागात विविध उंचीवर जाऊन हवा गुणवत्तेच्या पीएम, एसओटू, एनओएक्स, सीओ यासारख्या विविध मापदंडाचा अभ्यास करू शकते.

डेड एक्सिस हा विविध अनुमानांकरिता अतिशय गंभीर आणि भरवशाचा डेटा मिळतो. हा डेटा विश्वासाने संग्रहित केला जाऊ शकतो. हा डेटा मिळाल्यानंतर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचा वापर करता येतो. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या नेतृत्वात आणि नितीन लाभसेटवर यांच्या मार्गदर्शनात अंकित गुप्ता यांनी या यंत्रणेतील तंत्रज्ञानाची, अनिर्बंध मिड्डे यांनी हवामानशास्त्राची आणि पीयूष कोकाटे यांनी ड्रोनची जबाबदारी सांभाळली.

ही यंत्रणा तयार करण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागले. सेन्सर बसवणे हे यातील मोठे आव्हान होते. हवेचा सेन्सरवर परिणाम होऊ नये हे देखील पाहावे लागणार होते. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता प्रदूषण मोजणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यासमोर आम्ही या यंत्रणेचे सादरीकरण करू. अतिशय कमी किंमतीत तयार होणारी आणि अचूक डेटा देणारी ही यंत्रणा आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत देखील बोलणी सुरू आहेत.

-अंकित गुप्ता, पीयूष कोकाटे.