तीन नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ; आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आढावा घेतला

उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’चा विळखा आणखी घट्ट होत असून बुधवारी आणखी तीन रुग्णांना हा आजार झाल्याचे पुढे आले. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात वैद्यकीय शिक्षण खाते, आरोग्य विभाग, महापालिकेचा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात महापालिकेला तातडीने आजार नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश दिले. या आजारावर नियंत्रणासाठी शासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

मेडिकल, मेयोत आजपर्यंत एकूण २४ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले असून त्यात उपचारा दरम्यान मेडिकलमध्ये सहा रुग्ण दगावले, अशी माहिती  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्र्यांना दिली. मूत्रपिंड, हृदय, यकृतासह इतरही काही आजार असल्याने हे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचे मृत्यू असल्याचा दावा करण्यात आला.  सर्वाधिक आठ रुग्ण नागपूर जिल्ह्य़ातील असून त्यातील उपचारादरम्यान चौघे दगावले आहेत. नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्य़ांत डेंग्यूचेही रुग्ण वाढल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.  बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. मिलिंद गणवीर, मेडिकलच्या औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. योगेंद्र बनसोड, बालरोग विभागाचे डॉ. सी. एम. बोकडे, मेयोच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. पी पी. जोशी, बालरोग विभागाच्या डॉ. दीप्ती जैन, डॉ. अग्रवाल, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. चिव्हाणे, जयश्री थोटे आदी  उपस्थित होते.

रुग्ण आढळलेल्या भागात फवारणी

डॉ. दीपक सावंत यांनी नागपूर महापालिकेसह रुग्ण आढळलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाने तातडीने तेथे सर्वेक्षण करून कीटकनाशकांची फवारणी व इतर उपाय करण्याचे आदेश दिले. उपचाराबाबत सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांत मार्गदर्शक सूचना देऊन  खबरदारी घेण्याचे आदेशही याप्रसंगी दिले गेले.