News Flash

‘स्क्रब टायफस’ नोंदीचा घोळ अद्यापही कायमच!

नागपूरसह मध्य भारतात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढल्याने मेडिकलमधील या रुग्णांचा आकडा फुगला आहे

मेडिकल- आरोग्य विभागात समन्वय नाही

नागपूरसह मध्य भारतात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढल्याने मेडिकलमधील या रुग्णांचा आकडा फुगला आहे. येथे पन्नास रुग्ण पॉझिटिव्ह तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आरोग्य विभागाच्या नोंदीत नागपूर विभागात केवळ २७ पॉझिटिव्ह व दोन मृत्यूचीच नोंद आहे. यामुळे मेडिकल आणि आरोग्य विभागातही समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

पूर्व विदर्भात गेल्यावर्षी स्क्रब टायफसचे २०१ रुग्ण आढळले होते. पैकी ३३ जणांचा मृत्यू झाला होता. या आजाराची दखल घेत दिल्लीतून आरोग्य मंत्रालयाचे पथक नागपूरला आले होते. त्यांनी नागपूर जिल्ह्य़ातील काही भागात सापळे लावून या आजाराला कारणीभूत माईट्सला पकडण्यासाठी उंदरांना पकडून अभ्यासही सुरू केला होता. त्यावेळीही आजाराबाबत मेडिकल आणि आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे पुढे आले होते. परिणामी, वरिष्ठ पातळीवर काही बैठका घेऊन दोन्ही विभागांना सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु  या सूचनेकडे यंदाही दुर्लक्ष होत आहे.

शहरातील शसकीय मेडिकल रुग्णालयात या आजाराचे तब्बल ५० रुग्ण पॉझिटिव्ह व त्यातील ६ मृत्यू नोंदवले आहे. त्यातील दोन रुग्ण नागपुरातील आहेत. शासकीय रुग्णालय असल्याने सर्वात प्रथम ही नोंद आरोग्य विभागात होणे अपेक्षित आहे.

परंतु आरोग्य विभागाकडे पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्य़ातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयांत केवळ २३ जणांना हा आजार झाल्याचे आढळण्यासह पैकी दोन मृत्यू नोंदवले गेले आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात या गंभीर आजाराबाबत समन्वय नसल्याचे पुढे येत आहे. आरोग्य विभागाच्या पुणे येथील नोंदीतून हा घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

या विषयावर आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने मेडिकलकडून या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू फार्म अपूर्ण भरला जातो. यासह इतर चुकांमुळे ही नोंद करणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य होत नसल्याचे सांगण्यात येते. तर मेडिकलकडून मात्र अर्ज भरल्यावरही वारंवार त्रुटी काढत एक- एक कागदपत्र मागवल्या जात असल्याचे सांगण्यात येते.

एका आठवडय़ात ६७ डेंग्यू रुग्ण आढळले

उपराजधानीत स्क्रब टायफसनंतर आता डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत. सात दिवसांत विविध भागात ६७ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. महापालिकेकडून फवारणीच्या कामाला गती देऊन आजार नियंत्रणाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारी ते गेल्या आठवडय़ापर्यंत शहराच्या विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत डेंग्यूचे ३११ रुग्ण नोंदवले होते. त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण हे गेल्या दोन ते अडीच महिन्यातील आहेत. ही आकडेवारी अधिक असतानाच गेल्या सात दिवसांत शहरातील विविध भागात डेंग्यूचे आणखी ६७ रुग्ण नोंदवले गेले. रुग्ण वाढत असतानाच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील निवडक भागात डास अळ्या शोधमोहिमेपलीकडे काहीही केले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहरात डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण नोंदीत कमी असले तरी प्रत्यक्षात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण प्रत्येक दहा घरातून एका घरी असल्याचे सांगण्यात येते. शहरात नवीन ६७ रुग्ण आढळल्यामुळे आता एकूण डेंग्यूग्रस्तांची संख्या ३७८ वर पोहचली आहे. या माहितीला महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 3:27 am

Web Title: scrub typhus medical health care centre akp 94
Next Stories
1 जि.प. निवडणूक भाजपाला जड जाणार
2 विद्यापीठात अत्याधुनिक उपकरणांनी युक्त ‘रूसा भवन’
3 फटाक्यामुळे तीन ठिकाणी आग
Just Now!
X