पाच रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ निघाले

गेल्यावर्षी विदर्भात थैमान घालणारा ‘स्क्रब टायफस’ नागपूरसह काही जिल्ह्य़ांत पुन्हा विळखा घट्ट करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध रुग्णालयांत पाच जणांना हा आजार झाल्याचे पुढे आले असून त्यात दोन जण नागपुरातील आहेत. महापालिकेच्या नोंदीत बुधवारी हा प्रकार समोर आल्यावर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

शहरातील विविध रुग्णालयांत गेल्यावर्षी या आजाराचे २०१ रुग्ण आढळले होते. त्यातील ३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी ऑगस्ट महिन्यापासून हे रुग्ण आढळणे सुरू झाले होते. परंतु यंदा प्रथमच शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे पाच रुग्ण आढळले असून त्यातील दोघे नागपुरातील आहेत. एक जण नागपूर ग्रामीण, एक रुग्ण भंडारा आणि एक रुग्ण भोपाळचा आहे. पाच रुग्णांपैकी एक ३२ वर्षीय पुरुष असून इतर सगळ्या महिला आहेत. गेल्यावर्षी या आजारावर नियंत्रण मिळत नसल्याने दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने नागपुरात पथक पाठवून येथील उंदीर पकडून त्यावर संशोधन केले होते. आता पुन्हा पाच रुग्ण आढळण्याच्या वृत्ताला महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.

स्क्रब टायफस म्हणजे काय?

ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे, ज्याला पिसवा (चिगर किंवा सूक्ष्म कीटक) म्हणतात ते चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ हे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. जेथे झुडूप किंवा गवत असते त्यावर हे पिसवे आढळतात.  हे पिसवे उंदरांवर मोठय़ा संख्येने आढळतात. ते चावल्याने स्क्रब टायफस होण्याची शक्यता असते.