News Flash

वेणा तलावावर ३३ तास शोधमोहीम

गुरुपौर्णिमेच्या दिवशी नागपुरात आठजण वेणा तलाव परिसरात पार्टी करण्यासाठी गेले होते.

शेवटचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तलाव परिसरात ‘एसडीआरएफ’ची दोन पथके एकत्रित आली, तेव्हाचा क्षण.

शेवटच्या तरुणाचा मृतदेह सकाळी सापडला

सेल्फी आणि फेसबुकवर थरारक व्हिडिओ टाकण्याच्या नादात वेणा तलावात नौकाविहार करताना आठ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या तरुणांच्या शोधासाठी व मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी पोलीस, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांना तब्बल दोन रात्र आणि एक संपूर्ण दिवस अभियान राबवावे लागले. जवळपास ३३ तासांच्या शोधमोहिमेनंतर शेवटचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी नागपुरात आठजण वेणा तलाव परिसरात पार्टी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी तीन नावाडय़ांना पकडून तलावात नौकाविहार करण्याचा आग्रह धरला. या नौकाविहारावेळी त्यांनी तलावाच्या मध्यभागी जाऊन बोट एका खांबाला बांधली व सेल्फी घेतली. त्यानंतर ते दुसऱ्या एका बेटावर गेले व जलक्रीडा केली. तेथून परत मूळ किनाऱ्यावर परत येत असताना किनाऱ्यापासून १०० मीटर अंतरावर नावेत पाणी भरले आणि एकूण अकराजण पाण्यात बुडाले. त्यापैकी अतुल बावणे, अमोल दोडके आणि रोशन दोडके हे पोहत पाण्याबाहेर निघाले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि त्यांचे प्राण वाचले. मात्र, अंकित भोसकर, परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, अक्षय खांदारे, रोशन खांदारे आणि राहुल जाधव यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ७ ते ७.१५ च्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती माहिती पोलिसांनी रात्री ९ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानंतर १० वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ताबडतोब एसडीआरएफचेही एक पथक तेथे पोहोचले. तेव्हापासून शोधमोहीम सुरू झाली. सोमवारी दिवसभर ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक शैलेश बलकवडे, उपअधीक्षक सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ४० अधिकारी कर्मचारी परिसरात तैनात होते. पोलिसांनी दिवसरात्र तलाव परिसरात बंदोबस्त ठेवून नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेतली परिसरात शांतता राखण्याचे काम केले. तसेच निघालेल्या मृतदेहांचे पंचनामे करून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविणे आणि मृतदेह लवकरात लवकरात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, तर तलावात बुडालेल्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी एसडीआरएफचे दोन पथक आणि महापालिकेचा अग्निशमन विभाग, राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एक पथक, गावकरी आणि पट्टीचे पोहोणारे जगदीश खरे यांनीही परिश्रम घेतले. मात्र, पोलीस निरीक्षक ललित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अजय काळसर्पे आणि आर.एन. मडावी यांचे दोन बचाव पथक दिवसरात्र पाण्यात होते. सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत त्यांना सहा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले, तर मंगळवारी सकाळी ७ वाजता भोयर याचा मृतदेह सापडला. सर्व मृतदेह सापडल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला.

अशी राबवली शोधमोहीम

तलावात नाव बुडताना बघणारे कोणीच उपलब्ध नव्हते. त्यामुळे घटनास्थळ समजायला कठीण होते, परंतु नावाडी दिनेश बावणे याने एक मृतदेह काढला होता. त्याच्या माध्यमातून जागा निश्चित केली. त्या जागेच्या ५० मीटर परिसरात शोधमोहीम सुरू केली. सोमवारी सकाळी एका तासातच एक मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेह सापडत नव्हते. पहिले मृतदेह सापडलेल्या परिसरात १५ ते २० फूट खोल पाणी होते. तसेच परिसरात गाळ, चिला व शेवाळ प्रचंड होते. शेवटी एसडीआरएफचे दोन पथक व महापालिकेच्या एका पथकाद्वारे तिन्ही बोटींनी पाण्यात ‘व्हायब्रेशन’ केले. दरम्यान, घटनेत बचावलेला एक युवक घटनास्थळी आला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर घटनास्थळ समजले. सायंकाळपर्यंत ७ जणांचे मृतदेह सापडले होते, परंतु शेवटचा मृतदेह शोधण्यात रात्र झाली. मंगळवारी सकाळी शेवटचा मृतदेह किनाऱ्यापासून १०० मीटर अंतरावर पंपहाऊसजवळ सापडला.

अजय काळसर्पे, पोलीस उपनिरीक्षक, एसडीआरएफ

मृतांमध्ये चौघेजण पोहणारे

मृतांमध्ये चौघेजण पोहणारे होते. त्यांनी हातपाय मारून किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा दम न पुरल्याने पाण्याखाली गेले. यात अक्षय खांदारे, रोशन खांदारे, परेश काटोके आणि अतुल भोयर यांचा समावेश आहे. परेश काटोकेने पोहण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याचा दम संपल्याने तो पाण्यात बुडत असताना अमोल दोडके याने त्याला बऱ्याच अंतरावर आणले होते, हे विशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:20 am

Web Title: search operation in vena river end after 33 hours
Next Stories
1 वीज चोरी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांचीही साथ?
2 चारित्र्यहीन आईमुळे मुलीचा ताबा वडिलांकडे
3 सैनिकाच्या भूतदयेमुळे जखमी गाढव पोहोचले करुणाश्रमात
Just Now!
X