२४ तासांत दीड हजार नवीन बाधितांची भर

नागपूर :  रविवारनंतर सोमवारीही  पन्नासावर करोनाग्रस्तांचे बळी गेले,  तर २४ तासांत १,५५० नवीन बाधितांची नोंद  झाली. तीन दिवसांपूर्वी मेडिकलमधील ऑक्सिजनची पाईपलाईन फुटली होती, तिची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्यामुळे मेडिकलमधील बाधितांच्या खाटांवर मर्यादा आल्याने रुग्ण मेयोत पाठवले जात आहे. मेडिकलकडून येथील सुमारे दोन वार्डासाठी उसनवारीवर डॉक्टरांसह इतर कर्मचारी उपलब्ध केले आहे.

नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत दगावलेल्या ५० बाधितांपैकी ३७ रुग्ण शहर तर ७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.  जिल्ह्य़ाबाहेरील ६ रुग्णांचाही येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या बळींमुळे येथील आजपर्यंतच्या बळींची संख्या थेट १ हजार ३६५ वर पोहचली आहे. शहरात आज आढळलेल्या १ हजार ५५० रुग्णांपैकी १ हजार २५० रुग्ण शहरातील, २९४ रुग्ण ग्रामीणचे, ६ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या थेट ४१ हजार ३२ वर पोहचली आहे.

दरम्यान, मेडिकलमध्ये एका निर्माणाधीन कामादरम्यान तीन दिवसांपूर्वी ऑक्सिजनची पाईपलाईन फुटली. त्यामुळे रात्री १२ वाजता अचानक येथील ऑक्सिजनची मात्रा घसरल्याने सुमारे १२ रुग्णांना मेयो रुग्णालयात व  इतर काही रुग्णांना इतर वार्डात हलवले केले. या काळात येथील वार्डात काही मृत्यू झाल्याने त्याचे कारण काय, अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होती. परंतु मेडिकल प्रशासनाने ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याचा व मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.  जिल्हाधिकारी, व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांनी निरीक्षण करत दुरुस्तीचे आदेश दिले. त्यामुळे  मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेले व ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण सध्या मेयोत पाठवले जात आहेत. परंतु मेडिकल प्रशासन येथे  खाटा रिकाम्या झाल्यावर तेवढय़ा खाटांवर इतर रुग्णांना प्रवेश दिल्या जात असल्याचे सांगत आहे. त्यातच सध्या  खासगी रुग्णालयांमध्ये अत्यवस्थ रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाही. दुसरीकडे शासकीय रुग्णालयांतही रुग्ण वाढल्याने डॉक्टरांवर कामाचा भार वाढला आहे.

परिचारिकांच्या संपाबाबत रात्रीपर्यंत संभ्रम

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून ८ सप्टेंबरला ऐन करोना काळात राज्यव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुंबई स्तरावर चर्चा सुरू असल्याने संपाबाबत संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांत गोंधळ होता. त्यातच महाराष्ट्र विदर्भ नर्सेस असोसिएशनकडून मात्र संपात सहभागी नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला आहे.

१,३९० करोनामुक्त

दिवसभरात १ हजार ३५० तर ग्रामीण भागात ५० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या करोनामुक्त झालेल्यांची संख्या २८ हजार ६५८ वर पोहचली आहे. त्यात शहरातील २२ हजार ८४७ तर ग्रामीण भागातील ५ हजार ८११ जणांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार पार

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या सोमवारी ११ हजार ९ वर गेली आहे. त्यात शहरातील ७ हजार ३४२ रुग्ण तर ग्रामीणच्या ३ हजार ६६७ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी ६ हजार ३३९ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहे. ३ हजार १२० जणांवर विविध शासकीय व खासगी रुग्णालये, कोविड केअर सेंटरवर उपचार सुरू आहेत.