News Flash

ऑक्सफर्ड लसीची दुसरी मात्रा पुढच्या आठवडय़ात

पहिल्या टप्प्यात सारे काही सुरळीत

(संग्रहित छायाचित्र)

उपराजधानीतील शासकीय मेडिकल रुग्णालयात २३ ऑक्टोबरपासून पन्नास स्वयंसेवकांना वैद्यकीय चाचणीनुसार ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड या लस देण्यात आल्या होत्या. २८ दिवस पूर्ण होणार असल्याने पुढच्या आठवडय़ात या स्वयंसेवकांना पुन्हा या लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कुणातही लस दिल्यावर गुंतागुंत वाढली नसल्याने डॉक्टरांमध्ये उत्साह आहे.

मेडिकलच्या केंद्रात स्क्रिनिंग झाल्यावर १८ ते ५५ वयोगटातील एकही समस्या नसलेल्या व आरोग्याच्या दृष्टीने निरोगी असलेल्या पहिल्या १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला ही लस दिली गेली. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. त्यापूर्वी संबंधित स्वयंसेवकांची करोनासह इतरही रक्तांच्या तपासणी करून त्यांचा मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही इतिहास घेण्यात आला. त्यानंतर एकही आजार व गुंतागुंत नसलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. लस दिल्यावर पहिले दोन तास स्वयंसेवकांना एका विशिष्ट वार्डात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले गेले. त्यात काहीही अनुचित न आढळल्यावर त्यांना घरी सोडले गेले.

घरी सोडण्यापूर्वी स्वयंसेवकांना गर्दीत न जाण्यासह इतरही आवश्यक घ्यायच्या काळजीबाबत समुपदेशन करण्यात आले. दरम्यान, लस दिल्यापासून आजपर्यंत एकाही रुग्णामध्ये कोणतीही गुंतागुंत आल्याचे नोंदवले गेले नाही. त्यामुळे मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये उत्साह संचारला असून आता दुसऱ्या लसीनंतर या लसीचा प्रतिपिंड (अँटिबॉडी) निर्माण करण्यावर काय सकारात्मक परिणाम होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात येथील श्वसनरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम आणि वैद्यकीय अधीक्षक व या प्रकल्पाचे उपसमन्वयक डॉ. अविनाश गावंडे या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:00 am

Web Title: second dose of the oxford vaccine will be given next week abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मराठी भाषेला हिंदीचा स्पर्श सुखावणारा – राज्यपाल
2 एकाही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत नाही!
3 करोनामुक्तांची संख्या एक लाखाच्या उंबरठय़ावर
Just Now!
X