काळाभात आणि लालभात आकर्षणाचे केंद्र

मराठी कुटुंबातील दररोजच्या जेवणातील प्रमुख घटक कोणते.. भाजी, भात, वरण, पोळी, लोणचे. पण ताटात काळ्या रंगाचा भात असेलतर..  होय, बिजोत्सवात काळाभात आणि लालभात हे धानाचे देशी वाण लक्ष वेधून घेत आहे.

पारंपरिक वाणाचे संवर्धन आणि सेंद्रिय शेती पिकाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी म्यूर मेमोरिअल लॉन्स, महाराजबाग रोड येथे आजपासून तीन दिवसीय बिजोत्सवाला सुरुवात झाली. यामध्ये नैसर्गिक शेतीमाल, जंगलातील उत्पादने आणि त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.

शेतातील पिकाला कृत्रिमरित्या पाणी द्यायचे नाही. त्याला रासायनिक खतही पुरवायचे नाही. पावसाळ्यात जेवढे उत्पादन घेता येईल. तेवढेच घ्यायचे, असा चंग बांधून शेती करणारे शेतकरी येथे आले आहेत. अन्नधान्य, भाजीपाला, पालेभज्या आणि फळांच्या  परंपरागत बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील लोकही येथे आले आहेत.

येथील वेगवेगळ्या स्टॉलवर फळे, भाजीपाला, धान्य आदींचे १५० ते २०० प्रकार बघायला मिळतात. धानाच्या १५० प्रकारचे वाण एकाच स्टॉलवर आहेत. गव्हाचे १२ प्रकारचे वाण येथे आहेत. रासायनिक खत, कीटकनाशक, औषधांची फवारणी आणि कृत्रिमरित्या पाणी न देता हे वाण टिकवण्याचे काम देशभर काही मोजके लोक करीत आहेत. याचे यतार्थ दर्शन महोत्सवातून होते. ओडिशा येथून शेतकरी १५० धानाचे वाण घेऊन आले. यामध्ये लाल तांदूळ, काळे तांदूळ, पांढरे तांदूळ आणि सुंगधी तांदूळ आहेत. ‘कालाभात वाईट-१२०’ या नावाच्या वाणाचे १४० दिवसांत उत्पादन घेता येते, असे अनिता साहू म्हणाल्या.

सेंद्रिय शेतीमाल असे ओळखावे

  • वाकडे-तिकडे, ओबड-धोबड आकार
  • टोमॅटोची साल थोडी जाड
  • एकच उत्पादन एकसारखे राहत नाही.

रसायनमुक्त भाजीपाला, फळांच्या किंमती

  • टोमॅटो २० रुपये किलो
  • काकडी ४० रुपये किलो
  • कांदे-४० रुपये किलो
  • टरबूज-३० रुपये किलो
  • भेंडी-८० रुपये किलो
  • हळद पूड-२०० ग्रॅम ९० रुपये.

देशी बियाणे विक्रीसाठी

आंध्रप्रदेशातील जनपा रेड्डी वेंकटरमन हे शिक्षक आहेत. ते देशी वाणाच्या भाजीपाला बियाण्यांचे संवर्धनाचे काम करते. त्यांनी चेरी मिरची, शिकाई, सोपनट्स, बॉटल गार्ड्स, बिटर गार्ड्स यांचे बियाणे, वालाचे शेंगाची बियाणे आणली आहे. सतना, मध्यप्रदेश. बाबुलाल दाहिया यांनी १२ वाण आणले. काळीवाल, कठिया, कठुई, मालवा, हंसराज, पीसी, ३०६, सुपर फ्री, खैरा, मुडीया बंशी, बसिया, पैगांबरी, सरजना हे वाण आणले आहेत. ओडिशा येथून गीतांजली धान, पहाडी धान, काला जिराधान, भालुजटा धानाचे वाण आले आहे. भिवापूरची मिरची आणि वायगावची हळद आहेत. ज्वारी, डिंग, नाचणीचे लाडू, लसूण, अद्रक आहे. याशिवाय कुरडय़ा, पापड, शेवया, लोणचे आदी देखील येथे आहे. पश्चिम बंगलाकडून आलेले खादीचे स्टॉल आहे. येथे देशी कापूस आणि खादी मसलिनचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

दिवाणखान्यात पालेभाज्या उगवणे शक्य

शहरात कमी जागेत आणि उंच इमारतीत राहणाऱ्यांही आता परसबागेची हौस भागवता येणार आहे. शिवाय हिरवी, ताजी आणि रसायनमुक्त पालेभाजी रोजच्या जेवणात घेणे शक्य होणार आहे. यासाठी मेकर अड्डा या स्टॉलला भेट द्यावी. एका विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून   वेगवेगळ्या आकाराचे पेटय़ा येथे मिळतील. त्यात माती भरून पालेभाजी उगवता येते. हे लाकूड ओल्या मातीतही अधिक काळ टिकतो. तसेच लाकडाच्या पेटय़ा इंटेरिअर डेकोरशनसाठी देखील वापरता येतात.

बाजाराचा विचार केल्यास..

छत्तीसगड बस्तर येथील शिवनाथ यादव यांची चार एकर शेती आहे. नैसर्गिक शेती असल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर आधारित वर्षांतून एकच पीक घेतात. ते चार एकरात ४० ते ५० क्विंटल उत्पादन घेतात. धानाला १५०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे. तांदूळ ५० रुपये प्रतिकिलो जातो. साधारणात: शेतीसाठी मजुरांचा खर्च आणि इतर खर्च १५ हजार रुपये येतो. वर्षभरातून एकच पीक आणि त्यातील उत्पन्न यातून पती, पत्नी आणि दोन मुलांचे पालन पोषण होऊ शकत नाही. त्यामुळे मोलमजूरी करावी लागते, पण बाजाराचा विचार केल्यास शेती करू शकत नाही, असे यादव म्हणाले. त्यांनी पटेल सुपर या धानाच्या वाणापासून लाजनी सुपर हे वाण २००६ मध्ये विकसित केले आहे.