पालकांचा दबाव कारणीभूत 

शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण या नैसर्गिक प्रक्रियेसाठी पालकांकडूनच दबाव येत असल्याने त्यांच्या पाल्यांचे भवितव्य उजळण्यापूर्वीच कोमेजले जात आहे. जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये आढळून येणारा ‘सेल्फ हार्म’ (स्वत:चे नुकसान करून घेणे) हा प्रकार आता उपराजधानीतील काही शाळांमध्ये आढळून यायला लागला आहे.

काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांवर दबाव होता, पण तो दबाव आपला सहकारी विद्यार्थी कसा अभ्यास करतो, तो आपल्यासमोर तर जात नाही ना, आपण काय करायला हवे, या पद्धतीचा होता. आता मात्र या दबावाचे स्वरूप बदलले आहे. विद्यार्थ्यांचीही सहनशक्ती कमी झाल्याने या दबावापोटी स्वत:ला जखमा करून घेण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. अधिकांश पालक नोकरी करीत असल्याने पाल्यांसोबत त्यांचा संवाद दुरावला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर भावनिक गरजांवर बोलणेच होत नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावात असून ‘सेल्फ एन्ज्युरी’हा प्रकार त्यांनी अवलंबला आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या मनगटावर जखमा करून घेणे, पेन्सिल, पेन किंवा कंपास आणि नाहीच काही तर ब्लेडने हातावर कट्स मारण्याचे प्रकार आढळले आहेत.  आताची मुले जितकी तणावात दिसतात, तितकी आजवरच्या दोन दशकात कधीच नव्हती. शिकवणी वर्ग आणि शाळा अशा दोन पातळीवर एकाचवेळी विद्यार्थी लढत असतो. ही तारेवरची कसरत त्याला झेपते की नाही हे पालकांकडून पाहिलेच जात नाही. मुलांचा ‘परफॉर्मन्स’ हा पालकांच्या ‘डेकोरेशन’चा विषय झाला आहे.  यातून पाल्यांवरचा त्यांचा दबाव वाढत आहे. या मुलांची शारीरिक क्षमता कमी होत आहे. त्यांना साधा ‘स्क्रू ड्रायवर’ फिरवता येत नाही. साधी सायकलची चैन त्यांना लावता येत नाही. कारण सायकलची चैन दुकानातून लावून घेण्यासाठी पैसे दिले जातात. शैक्षणिक यश हे पैसे देऊन विकत घेता येते अशी पालकांची मानसिकता झाली आहे. आम्ही खर्च करायला तयार आहोत, पण आम्हाला उत्तम परिणाम हवा या मानसिकतेतून शिकवणी वर्गात पाठवले जाते. या सर्व बाबी अशा निराश विद्यार्थ्यांच्या समुपदेशनातून पुढे आल्या आहेत.

योगासनांवर भर द्यायला हवा

आपली संस्कृती पूर्णपणे बदलली आहे. मुलांना पालकांचा वेळ हवा असताना तो मिळत नाही आणि वेळेच्या मोबदल्यात पाल्यांनी केलेली अवास्तव मागणी पालकांकडून पूर्ण केली जाते. यात मुले एकतर मुजोर होतात किंवा मग घाबरून स्वत:ला जखमा करून घेतात. जंकफूडचा परिणाम मुलांच्या स्वभावात दिसून येत आहे. त्यासाठी पालकांचे समुपदेशन आणि विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व ध्यानासाठी शाळेत योगासनांवर भर द्यायला हवा.    – डॉ. समीक्षा साठे, मनोचिकित्सक

गुणांची हाव धोकादायक ठरतेय

दहावीच्या एका विद्यार्थ्यांला असेच पुन्हा कॉपी करताना पकडण्यात आले. अतिशय हुशार विद्यार्थ्यांने ही कृती करावी, हे शिक्षकांनाही खटकणारे होते. त्याला प्रेमाने विचारपूस केली तेव्हा पुन्हा पालकांचा दबाव हेच कारण समोर आले. सकाळी शिकवणी वर्गात गणिताचा पेपर होता आणि लागलीच शाळेत संस्कृतचा. एकाचवेळी दोन पेपरचा अभ्यास होणार नाही हे पालकांना सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. याउलट दोन्हीकडे चांगले गुण हवेत अशी तंबी त्यांनी दिली. त्यामुळे हा मार्ग पत्करल्याचे त्याने सांगितले.

.. अन् त्याने पहिल्यांदा कॉपी केली

एका नामांकित शाळेतील विद्यार्थी एक उत्कृष्ट खेळाडू होता. खासदार महोत्सवातील क्रीडा स्पध्रेत तो शाळेचे प्रतिनिधित्व करत होता. त्याचवेळी त्याची परीक्षा देखील होती. शाळेने त्याला परीक्षेपासून सूट दिली होती, पण स्पर्धा लवकर आटोपली आणि पालकांनी त्याला जबरीने पेपर द्यायला पाठवले. परंतु अभ्यास नीट झाला नसल्याने आयुष्यात पहिल्यांदा त्याने कॉपीचा आधार घेतला. अतिशय नम्र आणि हुशार विद्यार्थ्यांने केलेल्या प्रकाराने शिक्षकही चक्रावले. पालकांना अभ्यास झाला नाही हे सांगितल्यावरही आणि शाळेने सवलत दिल्यानंतरही पालकांनी बळजबरीने पाठवले आणि ही कृती करावी लागल्याचे त्याने समुपदेशनात सांगितले.

पालकांनाच धडे द्यायची गरज

शिकवणी वर्गातून विद्यार्थ्यांना पाठांतराचे धडे दिले जातात, तर शाळेतून त्याला सर्वागीण पाठ शिकवला जातो. त्यातही पालकांचा दबाव असतो. त्यामुळे पालकांना ‘पालकत्त्वा’चे धडे देण्याची वेळ आली आहे. शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती हसतखेळतच व्हायला हवी, नाही तर ‘सेल्फ हार्म, सेल्फ एन्ज्युरी’ सारखे प्रकार वाढत जातील.     – प्रा. दामोदर ठोंबरे, ज्येष्ठ शिक्षक