14 October 2019

News Flash

होमगार्ड्सचे कुटुंबीयांसह अर्ध जलसमाधी आंदोलन

शासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

अर्ध जलसमाधी आंदोलनात सहभागी होमगार्ड व त्यांचे कुटुंबीय.

ड्रममध्ये बसून शासनाविरोधात घोषणा

सेवा समाप्त केलेल्या होमगार्डला कामावर परत घ्या, समान काम समान वेतन यासह इतर न्याय्य मागण्यांसाठी २८ जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त होमगार्ड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज बुधवारी संविधान चौकात अर्ध जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बसून आंदोलकांनी शासनविरोधात घोषणा दिल्या.

शासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात एक चिमुकली आईच्या कडेवर बसून सहभागी झाली होती. यावेळी संघटनेचे सचिव नामदेव खानझोडे म्हणाले, काही राज्यांमध्ये होमगार्डला ३६५ दिवस बंदोबस्तात लावले जाते. परंतु महाराष्ट्रात ८० दिवसही काम मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समान काम-समान वेतनाची येथे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे होमगार्ड हलाखीचे आयुष्य जगत आहे. त्यातच शासनाने आमच्याकडे लक्ष देण्याऐवजी उलट ११ हजार होमगार्ड्सची सेवा समाप्त केली आहे. त्यामुळे अनेकांचे कुटुंब उघडय़ावर आले आहे. सेवा समाप्त केलेल्या सर्व होमगार्डची सेवा सुरू करा, सर्वाना ३६५ दिवस कामावर घेऊन त्यांना समान काम समान वेतन द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुरेश दुधे, गणेश माणूसमारे, पुंडलिक गुडधे, वीरेंद्र उके, चेतन मासूरकर उपस्थित होते.

.. तर उद्या मुंडण करणार

न्याय न मिळाल्यास आठ फेब्रुवारी रोजी महिला व पुरुष संवर्गातील होमगार्ड मुंडण आंदोलन करणार असून १० फेब्रुवारीला अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे आंदोलनात जाहीर  करण्यात आले.

First Published on February 7, 2019 2:09 am

Web Title: semi samadhi movement with family members of home guards