महापालिका निगरगट्ट, तक्रार करूनही दुर्लक्ष

सिमेंट रस्ते बांधताना विजेच्या तारा काढण्यात न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी या तारा हटवण्याची मागणी महापालिककडे केली. मात्र, पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने स्वखर्चाने या सळया काढल्या.

शहरात सिमेंट रस्त्यांची कामाला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्यांवरील विजेचे खांब आणि तारा हटवण्यात न आल्याने हे खांब, तारा वाहतुकीस अडसर ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहेत. ज्येष्ठ नागरिक कृ.द. दाभोळकर प्रतापनगर चौकाकडून नवनिर्माण सोसायटीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीच्या मागच्या चाकात रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक्समधून वर आलेल्या सळया गेल्या होत्या. त्यामुळे ते पडता पडता वाचले. यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. तातडीने त्या सळ्या काढून घेण्याची विनंती केली, परंतु हे काम महावितरणचे असल्याचे सांगून महापालिकेने जबाबदारी झटकली. त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने एका मजुराला बोलावून सळ्या कापून टाकल्या. यामुळे अशा पद्धतीने कोणालाही पुढे अपघात होणार नाही. महापालिका आणि पदाधिकारी एवढय़ा निगरगट्टपणे कसे वागू शकतात? असा उद्विग्न सवालही दाभोळकर यांनी केला.

शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट करण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीला त्रास होतो. एका बाजूने सिमेंट रस्ता उंच आणि दुसऱ्या बाजूला डांबरी रस्ता खाली असे सर्वत्र आढळून येते. यामुळे दुचाकी चालकांना विशेष महिला, ज्येष्ठ नागरिकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यातल्या त्यात विजेचे खांब, तारा न हटवताच रस्त्यांचे बांधकाम झाले आहे. नंदनवन, गुरुदेवनगर पेट्रोल पंपासमोर अशाच प्रकारे विजेचे खांब रस्त्यावर आले आहेत. तसेच रामेश्वरी सिमेंट रस्त्यावर देखील विजेचे खांब आहे. हे खांब अपघाताला निमंत्रण देत आहे.

प्रतापनगर चौकातील घटना तर भयानक आहे. तारावर ब्लॉक्स बसवण्यात आले. या तारा वाहनांना अडकून अपघात होत होते. याकडे लक्ष वेधल्यानंतरही एकमेकांकडे बोट दाखवण्याचा कोडगेपणा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे दाभोळकर यांनी सांगितले.

प्रतापनगर चौकाकडून घराकडे जात असताना अचानक पडता पडता वाचलो. दुचाकी थांबवून पाहिले तर रस्त्यावर तीन-चार सळया रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक्समधून वर आल्या होत्या. या सळयांमुळे माझ्या वाहनाचे संतुलन बिघडले. महापालिकेकडे याची तक्रार केली, परंतु हे काम महावितरणचे असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्यात आली. त्यामुळे एका मजुराला बोलावून त्या सळया कापून टाकल्या.’’

– ज्येष्ठ नागरिक कृ.द. दाभोळकर