सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्या मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ गांधीवादी नेते मा.म.गडकरी यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये व मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या कालखंडात काम केले त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारे मा.म.गडकरी यांना देण्यात येणार आहे. वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळ व सुरगाव आश्रमात विनोबा भावे यांच्यासोबत ग्रामसफाईचे काम केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमध्ये तत्व प्रचारकाच्या भूमिकेत १३ वर्षांपर्यंत वर्धा, नागपूर, अमरावती, येथे गांधी विचार केंद्र चालविले. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आतापर्यंत हा पुरस्कार डॉ.भा.ल.भोळे, पन्नालाल सुराणा, डॉ. बाबा आढाव, डॉ.आ.ह.साळुंखे, प्रा. एन.डी. पाटील, रामकृष्णदादा बेलुरकर, शरद जोशी, डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ २० नोव्हेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनी होणार आहे.