वरिष्ठ पत्रकार हरतोष सिंग बल यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाची देशात सत्ता आल्यापासून सर्व यंत्रणांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात येत असून त्यातून न्यायपालिकाही सुटलेली नाही. त्यामुळे सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे दिवंगत सीबीआय न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातही त्यांना न्याय मिळत नाही. यावरून न्यायपालिकेवर असलेला दबाव अधोरेखित होते, असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार हरतोष सिंग बल यांनी केले.

प्राचार्य या.वा. वडस्कर स्मृती व्याख्यानाचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजच्या श्रीमती विमलाताई देशमुख सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्रा. बबनराव तायवाडे होते. यावेळी नागेश चौधरी, विशाखा वडस्कर उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा अगदी स्पष्ट आहे. त्यांना हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची असून त्यांच्या विचाराने मुसलमान, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, शीख, पारसी असे लोक हिंदू राष्ट्रात नाहीत. शिवाय जातीच्या आधारावर आरक्षणाला त्यांचा विरोध कायम आहे. आरएसएस स्वत:चे धोरण राबवत असताना काही गोष्टी अंगावर आल्यानंतर दुटप्पी वक्तव्य करून वेळ मारून नेते. मात्र, त्यांची विचारधारा बदलत नाही. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाच्या आधारावर त्यांचे सर्व व्यवहार चालतात. त्या दृष्टीनेच संघाच्या विविध उपशाखा सामाजिक जीवनात असून त्या कार्य करतात व विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न करतात. देशात सरकार कुणाचेही असले तरी संघ हा गेल्या काही वर्षांपासून सतत वाढत आहे. काँग्रेसच्या सरकारमध्येही त्यांना मदत करणारे अधिकारी असतात आणि ते नंतर भाजपमध्ये प्रवेश करतात. याचे दाखले विद्यमान सरकारमध्ये असलेले अनेक मंत्री व नेत्यांच्या माध्यमातून मिळतात.

पूर्वी शारीरिक व मानसिक हल्ले व्हायचे. आता विचार, संस्कृती आदींवर हल्ले करण्यात येत आहेत. गेल्या चार वर्षांपासून देशातील लोकशाही बळकट करणाऱ्या स्वतंत्र यंत्रणांवर संघ व भाजपकडून हल्ले सुरू आहेत. न्या. लोया यांचा मृत्यू त्याचाच एक भाग आहे.  न्यायाधीश असतानाही त्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही. यावरून न्यायपालिकेवर किती दबाव असेल, हे सांगायला नको. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. मात्र, ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून पुढील १० ते १५ वष्रे आपल्या हाती आहेत. संघाला वेळीच रोखले गेले नाही, तर भविष्यात त्याचे अतिशय वाईट परिणाम होतील, असेही हरतोष सिंग बल यावेळी म्हणाले.