News Flash

सत्ताधाऱ्यांना सिंहाचे नव्हे, शेळ्यांचे कळप हवेत!

डॉ. मनोहर यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे

ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांची खंत; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

सत्तेची दहशत प्रचंड असते. सत्ता सांगेल त्या बाजूने दहशतग्रस्त मन वळत असते. सत्ताधाऱ्यांना कायम अशीच भेदरलेली, घाबरलेली माणसे हवी असतात. कारण, त्यांना सिंहाचे नव्हे तर शेळ्यांचे कळप निर्माण करायचे असतात, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत व  कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली.

डॉ. मनोहर यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्त त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या भेटीत डॉ. यशवंत मनोहर यांनी सभोवतालच्या असहिष्णू वातावरणामुळे होणारी त्यांच्या मनाची घालमेल अतिशय कठोर शब्दात मांडली.

ते म्हणाले, आपल्यावर अन्याय होतोय हे माहिती असूनही समाज तो निमूटपणे सहन करतो. असा अन्याय सहन करणारा समाज एका अर्थाने प्रेतांचा समाज आहे! असा समाज सत्ताधाऱ्यांना वैचारिक बलात्कारातून जन्मास घालायचा असतो. आज वर्तमानाचे संतुलन बिघडले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक राजकीयदृष्टय़ा वर्तमानाला मनोरुग्णता आली आहे.

उन्नाव, सहारणपूरसारख्या असंख्य घटना देशात घडत आहेत. महिला, लहान मुलींवरील बलात्कार, अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढले आहेत. स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराचे संदर्भ वेगळे आणि खोल आहेत. आपल्या मेंदूत धार्मिकता घट्ट रुतली आहे, धर्माने अज्ञान अधिक घट्ट केले आहे, धर्माने एका अर्थाने गोठवूनच टाकले आहे! त्या तुलनेत बुद्ध प्रयोगशील आहे. माणूस पुढे नव्हे तर विचार पुढे न्यायचा असतो. जे मूल्यांवर उभे असते. ते पुढे जात असतात, याकडेही मनोहरांनी लक्ष वेधले.

ही अज्ञानाची शिक्षा

आज समाज ज्या स्थितीतून जातोय ते फारच भयावह आहे. ‘जयभीम’ का म्हटले म्हणून किंवा ‘जय श्रीराम’ का म्हटले नाही म्हणून माणसे मारली जात आहेत, एवढी  त्यांची संस्कृती हिंस्र झाली आहे. आपण सर्वजण एकत्र न येण्याची शिक्षा भोगत आहोत. जात, धर्म, वंश, कूळ अशा बेडय़ांमध्ये आपण अडकलो आहोत. अतिधार्मिक असण्याचा हा परिणाम आहे. माणूस असल्याचे स्वातंत्र्य तुम्हाला भोगता येत नही. ही अज्ञानाची शिक्षा आहे.

म्हणून मी आंबेडकरवादी आहे

आज समाज ज्या स्थितीतून जातोय ते फारच भयावह आहे. ‘जयभीम’ खरे स्थितीशील, जडवादी ही एक आणि गतिशील, लौकिकवादी वा ईहवादी ही दुसरी अशा दोनच संकल्पना आहेत. मी लौकिकवादी, ईहवादी छावणीचा माणूस आहे. मी अंधश्रद्धा नाकारतो. दैववादी नाही. वेदप्रामाण्य नाकारतो. सर्व माणसे सारखी आहेत, असे मानतो. स्त्रीपुरुष भेद मानत नाही. विज्ञाननिष्ठ आहे. पुनर्रचनावादी आहे. मनाची पुनर्रचना झाली पाहिजे, हा बुद्धाचा मार्ग अवलंबतो. ही सर्व मूल्य माझ्या जगण्यात असल्यामुळे मी आंबेडकरवादी आहे.

पंचाहत्तरीचा आनंद भोगता येत नाही

बेरोजगारी, गरिबी, महागाई, अत्याचार, धर्माधता असे प्रश्न आजूबाजूला मोठय़ा संख्येने आहेत. माझ्या पंचाहत्तरीचा निश्चितच आनंद आहे, पण तो मला भोगता येत नाही. समाजातील प्रश्नांनी माझा आनंद हिरावून घेतला आहे. तरीही मी लिहायचा प्रयत्न करतोय ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ हा मौज प्रकाशन निर्मित ११वा कवितासंग्रह लवकरच येत आहे. एक शंभर-सव्वाशे पानांची ‘स्वातंत्र्य’नावाची कादंबरी डोक्यात आहे. ती लवकरच पूर्ण करेल, अशी माहितीही डॉ. यशवंत मनोहर यांनी दिली.

कुठलाही लेखक, साहित्यिक त्यांच्या निर्मितीबाबत समाधानी नसतो. त्याने ते असूही नये. यापेक्षाही चांगले काही निर्माण व्हावे, अशी त्याची इच्छा असते. संवेदनशील माणसाला कायम तसे वाटत असते. शेवटी साहित्य म्हणजे माणसा माणसांतील संबंध. सर्व प्रकारचा गुंतवळा म्हणजे जीवन. या गुंतवळ्याचे मर्म शोधण्यात साहित्यिक प्रयत्नरत असतो. अनंत वर्षांपासून हा शोध सुरू आहे. मात्र, मनुष्य चिमटीत सापडत नाही.

डॉ. यशवंत मनोहर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:35 am

Web Title: senior thinker dr yashwant manohar maharashtra politics
Next Stories
1 आधार कार्डवर नाव बदलण्यासाठी सहा महिने खेटे
2 वाहने जाळण्याचे लोण उपराजधानीतही
3 Pranab Mukherjee at RSS Event: तीन महिन्यांपुर्वीच प्रणव मुखर्जींच्या नावावर झालं होतं शिक्कामोर्तब
Just Now!
X