15 October 2018

News Flash

लोकजागर : सत्तेचा वैदर्भीय सुगंध!

राजकीय पटलावर विदर्भाचे महत्त्व एवढे वाढायला कारणेही भरपूर आहेत.

आजवर उपेक्षा सहन करणारा विदर्भ आता अनेकांना आवडू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ताकतवर नेत्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात येऊन आंदोलन करावेसे वाटते, भाजपमधील असंतुष्टांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून  आंदोलन करण्याची सुरसुरी येते. हा विदर्भाचा सन्मान समजायला काही हरकत नाही. राजकीय पटलावर विदर्भाचे महत्त्व एवढे वाढायला कारणेही भरपूर आहेत. त्यातले प्रमुख कारण विदर्भाविषयी अनुकूलता बाळगणाऱ्या भाजपची राज्यात सत्ता येणे. केवळ सत्ताच नाही तर वैदर्भीय पुत्र असलेल्या फडणवीसांचे मुख्यमंत्री होणे. यामुळे सत्तेचा लंबक विदर्भाकडे झुकणे. यामुळेच विदर्भाच्या मातीचा सुगंध इतर पक्षांना सुद्धा खुणावू लागला आहे. आजवर कधी घडले नव्हते ते सध्या येथे घडते आहे. जन्माला आल्यापासून सत्तेची चव चाखणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष येथे रस्त्यावर उतरला आहे. रोज पंधरा ते वीस किलोमीटर पायी चालणारे अजित पवार शेतात जात आहेत. बाजरीची भाकरी खात आहेत. रस्त्यावरून जाणारे एखादे ट्रॅक्टर चालवत आहेत. सुखासीन आयुष्याला बगल देत सोयी नसलेल्या शेतकऱ्यांच्या घरात मुक्काम ठोकत आहेत. एरवी भेटले की आमच्या भागात असं आहे, म्हणून गप्पांची सुरुवात करणारे जयंत पाटील शेतीचे बांध तुडवत आहेत. गावच्या पारावर बसून शेतकऱ्यांशी गप्पा हाकत आहेत. त्यांचे प्रश्न, त्यांचे दु:ख समजून घेत आहेत. सरकारवर दणकून टीका करण्यात अजिबात वेळ न दवडणारे धनंजय मुंडे प्रतिवादाचे काम बाजूला ठेवून शेतीची शिवारे पालथी घालत आहेत. एरवी वारीत फेर धरून मनसोक्त नाचणाऱ्या सुप्रिया सुळे शेतकरी महिलांसोबत फुगडी खेळत आहेत. महिलांचे प्रश्न समजून घेतानाच मुलींच्या गोतावळ्यात रमत आहेत. बोचऱ्या थंडीची पर्वा न करता या नेत्यांचा जनतेशी होत असलेला संवाद सुखावणारा बदल आहे. आजवर विदर्भाच्या वाटय़ाला असा बदल कधीच आला नव्हता. यावेळचे चित्र मात्र वेगळे आहे व वैदर्भीय जनता त्याकडे अगदी कुतूहलाने बघते आहे. आजवर राज्याचे राजकारण करणारे बरेच नेते झाले. मात्र, विकासाचा विचार करताना या नेत्यांच्या प्रादेशिक अस्मिताच टोकदार राहिल्या. सत्ता सांभाळताना सुद्धा या नेत्यांनी या अस्मितेला जास्त महत्त्व दिले. यामुळे प्रादेशिकवादाची भावना जनतेच्या मनात रुजली व फुटीरतेची भाषा तोंडून बाहेर पडू लागली. ही भाषा अथवा भावना केवळ एकसंघतेची वक्तव्ये करून संपुष्टात येत नाही तर त्यासाठी कृती देखील करावी लागते, हे या नेत्यांच्या लक्षात कधी आलेच नाही. या अर्थाने विचार केला तर राष्ट्रवादीला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही हे शहाणपण आल्हाद निर्माण करणारे आहे, यात शंका नाही. विदर्भात आंदोलन करण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय भलेही राजकीय असेल पण तो योग्य आहे. सध्या विदर्भ सत्तेची ऊब अनुभवत असला तरी येथील प्रश्न, समस्या संपलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या दैनावस्थेत यत्किंचितही बदल झालेला नाही. कधी निसर्गाचा कोप तर कधी कीड तर कधी अंगावर अचानक आदळलेली नोटाबंदी अशा अनेक संकटांनी तो बेजार झाला आहे. योग्य भाव न मिळण्याचे दुखणे तर कायमचे आहे. एकेकाळी हाच विदर्भ काँग्रेसच्या पाठीशी भक्कम उभा होता. भाजपने अगदी नेटाने प्रयत्न करून ही पाठिंब्याची तटबंदी मोडून काढली व गेल्या निवडणुकीत जनतेचा कौल मिळवला. एका अर्थाने भाजपचा गड असलेल्या भागात आंदोलन करून थेट सत्तेलाच सुरुंग लावण्याचे मनसुबे राष्ट्रवादीचे आहेत, हे या आंदोलनाच्या निमित्ताने उघड झाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे राजकारण जरूर करावे, पण या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी जे दु:ख ऐकले, ज्या समस्या ऐकल्या, त्या विसरू नयेत ही माफक अपेक्षा आहे. वैदर्भीय जनता मोकळी ढाकळी आहे. आस्थेने चौकशी करणाऱ्यावर मनापासून प्रेम करणे हे येथील माणसाच्या रक्तातच आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने जनतेशी जुळलेली नाळ या नेत्यांनी मध्येच तोडू नये. सत्तेत असतानाचा राष्ट्रवादीचा विदर्भाला आलेला अनुभव फारसा चांगला नाही. निधी पळवून नेण्याचे आरोप या पक्षावर सतत होत राहिले व त्यातून या पक्षाविषयी नकारात्मकता तेवढी लोकांच्या मनात भिनत राहिली. ती पुसून काढण्याची चांगली संधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता आहे. याच पक्षाचे आर.आर. पाटील यांचा वेगळा अनुभव विदर्भाने घेतला होता. त्यांनी हक्काने गडचिरोलीचे पालकत्व मागून घेतले होते. विदर्भाविषयीचे प्रेम त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवायचे. त्यामुळेच विदर्भात त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा या नेत्यांचा प्रयत्न म्हणूनच चांगला आहे. निवडणुकीतील यशापयशावर विदर्भावरील प्रेमाची उंची कमी जास्त ठरवू नका, असेही या घाम गाळणाऱ्या नेत्यांना सांगणे गरजेचे आहे. वैदर्भीयांविषयीचा दुसरा उमाळा भाजपमधील असंतुष्टांच्या संदर्भातला आहे. भाजपमध्ये राहून विरोधी सूर आळवणारे यशवंत सिन्हा यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विदर्भातच का यावेसे वाटले, याचे कारण स्पष्ट आहे. फारशा माहितीत नसलेल्या शेतकरी जागर मंचाचे निमंत्रण ते स्वीकारतात. आंदोलन करतात. पोलिसांनी सोडून दिल्यावर सुद्धा थंडीत कुडकुडत बसतात. त्यांच्या समर्थनार्थ इतर असंतुष्टांची फौज धावते. काँग्रेस व राष्ट्रवादी तत्परतेने पाठिंबा देते. हे सारे राजकीय नाटय़ विदर्भात घडते, कारण मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. सरकारांवर नियंत्रण ठेवून असणारी संघ नावाची मातृसंस्था नागपुरात आहे. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर विदर्भात जाऊन ‘हटयोग’ करण्याशिवाय पर्याय नाही, याची कल्पना सिन्हा व त्यांच्या गोतावळ्याला आहे. त्यामुळेच ते दोनशे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी विदर्भात येतात. हे सारे सत्तेच्या वैदर्भीय सुगंधातून घडते आहे, याची जाणीव साऱ्यांना आहे. तरीही यासाठी फडणवीस व गडकरींना धन्यवाद द्यायला हवे. कारण त्यांच्यामुळे विदर्भाचे राजकीय वजन वाढले आहे. एरवी कधीही विदर्भ राजकीय घडामोडीचे केंद्र नव्हता. हिवाळी अधिवेशन सोडले तर हा प्रदेश कमालीचा शांत असायचा. आता ही शांतता जाऊन गजबज सुरू झाली आहे. ही गजबज निर्माण करणाऱ्यांचे हेतू कोणतेही असो पण त्यामुळे या प्रदेशात एक जिवंतपणा आला आहे. आपले ऐकून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचा अनुभव येथील जनतेला येऊ लागला आहे. हे चांगले लक्षण आहे. मात्र, येथील प्रश्नांचे काय? याचे उत्तर आधी जनतेचा विश्वास मिळवलेल्या व आता विश्वास मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकाला भविष्यात द्यायचे आहे.

devendra.gawande@expressindia.com

First Published on December 7, 2017 1:50 am

Web Title: separate vidarbha devendra fadnavis ncp yashwant sinha