सय्यद मुजफ्फर हुसेन यांची माहिती

नागपूर : करोनासारख्या महासाथीचा आजार उद्भवल्यास  लोकांनी घरातच नमाज पडावी, असे धार्मिक ग्रंथात नमूद आहे. एवढेच नव्हेतर विलगीकरण, सामाजिक अंतर,आपल्यामुळे इतर कुणाला तो आजार होणार नाही याची काळजी घेण्याची, हात स्वच्छ  धुण्याचा सल्लाही या धार्मिक ग्रंथात आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सय्यद मुजफ्फर हुसेन यांनी केला आहे.  दिल्लीतील मरकज येथे हजारो लोक एकत्र आल्याने रुग्णांची संख्या देशभर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे दोनदा सदस्य राहिलेले सय्यद मुजफ्फर हुसेन यांनी एका चित्रफितीद्वारे महासाथीच्या आजाराच्या काळात मुस्लिमांना कसे वागावे, याचे मार्गदर्शन कुरान, हदीसच्या हवाल्याने केले आहे.

प्रत्येक हदीसमध्ये प्रत्येक विषयांवरती सविस्तर माहिती आणि उपाय योजना सांगितल्या आहेत.  त्यासंदर्भात अत्यंत महत्वाची हदीस आहे. त्यात असे म्हटले आहे की, महासाथी च्या काळात  लोकांनी घरातच नमाज पडावी. कारण, कुरणामध्ये म्हटले आहे की, पूर्ण जगच मशीद आहे. कब्रस्तान आणि घरातील ‘वॉशरूम’ सोडले तर कुठेही नमाज पडू शकता, असे त्यांनी अल तिरमजी (अल-सलाह, २९१) चा दाखला देऊन म्हटले आहे.  कुरान शरीफच्या सूरा संख्या ५ मध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, ज्या देशात राहत असाल तेथील कायदे-नियम पाळावे. करोना सारख्या विषाणूची बाधा झाली असल्यास स्वताचे विलगीकरण करा, दुसऱ्याला त्याची लागण होणार नाही. याची काळजी घ्या, असे सुनान इब्न मजहा (२३४०) मध्ये म्हटले आहे. सामाजिक अंतर राखणे आणि प्रवास न करणे, मास्कचा वापर करणे आदीबाबत देखील सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.