महेश बोकडे

शासनाच्या सूचनेवरून एसटी महामंडळाने आंतरजिल्हा एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र आवश्यक नियम पाळून एसटी धावत आहे. परंतु पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा  या तीन जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणाचा अजब आदेश तेथील जिल्हा प्रशासनाने काढला. त्यामुळे संबंधित जिल्ह्यात प्रवासी जाणे कमी झाल्याने महामंडळाला तेथील फेऱ्या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत.  नागपूरहून तीन दिवसांपासून  पुणे फेरी सुरू झाली आहे. प्रत्येक बसला २१ ते २२ प्रवासी असल्याने १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. तेथे या आजाराचा मोठा प्रादुर्भाव असला तरी विलगीकरणाचा नियम नाही. या तीन जिल्ह्य़ात मात्र करोनाच्या नावाखाली  प्रशासन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचे चित्र असून राज्यात एकसारखे नियम का नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘‘एसटी महामंडळाला विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी एसटी बसच्या प्रत्येक आसनावर १ प्रवासी बसवायचा आहे. त्यामुळे एसटीची क्षमता निम्म्याने कमी झाली असली तरी महामंडळाने प्रवास भाडे पूर्वीप्रमाणेच ठेवल्याने एसटीची हानी वाढली आहे. त्यातच विविध जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने एसटीला प्रवासी मिळणे आणखी कमी झाल्यास हानी वाढून महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.’’

– नितीन बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.

‘‘भविष्यात प्रत्येकाला करोनासोबत जगायचे आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून महामंडळाला आपल्या सेवा सुरू ठेवाव्या लागणार आहे. सध्या प्रवासी क्षमता निम्म्याने कमी झाल्याने महामंडळाची हानी निम्म्याने वाढली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या मनमानी निर्णयाने आणखी प्रवासी कमी होतील. त्यामुळे कामगारांच्या नोकरीचा प्रश्न उद्भवू शकतो. तातडीने हा निर्णय बदलण्याची गरज आहे.’’

– मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक.