आतापर्यंत चार खून, एका खुनातून निर्दोष सुटका

अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने खून करणाऱ्या सिरीयल किलरला अटक करण्यात लकडगंज पोलिसांना यश आले आहे. मात्र, आरोपीच्या अटकेनंतर उघडकीस आलेल्याआलेल्या खुनाच्या घटनांनी पोलिसांनाच धक्का बसला असून त्याने आतापर्यंत चार खून केले आहेत, पैकी एका खुनातून त्याची निर्दोष सुटका झाली आहे.

दुर्गेश ऊर्फ छल्ला ध्रुपसिंग चौधरी (वय २८) रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी असे नराधम आरोपीचे नाव आहे. गेल्या २६ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारी रेल्वेस्थानक मालधक्का परिसरातील झुडुपात एका तरुणाचा धड नसलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.

त्यावेळी तो खून असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाले. मात्र, मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह दफन केला. मात्र, त्याच्या वस्तू सांभाळून ठेवल्या. खुनाचा तपास करण्यासाठी मृतदेहाची ओळख पटवणे आवश्यक होते. त्यामुळे पोलिसांनी प्रथम शहरातील बेपत्ता लोकांचा शोध घेतला. त्याचवेळी नंदनवन परिसरातील देशपांडे ले-आऊट येथे राहणारा मोहम्मद अरमान मोहम्मद मालेसरवर (१५ वष्रे) हा मुलगा २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना मृतदेहाजवळ सापडलेले कपडे व इतर वस्तू दाखवल्या. त्यावेळी त्या वस्तू अरमानच्याच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता अरमान हा एका तरुणासोबत मालधक्क्याकडे जाताना दिसला. पोलिसांनी दुसऱ्या तरुणाचा शोध घेतला असता दुसऱ्याच दिवशी कळमना पोलिसांनी त्याला एका चोरीच्या गुन्ह्य़ात पकडले. तो सध्या कारागृहात असल्याचे समजते. त्याचा पूर्वेतिहास तपासला असता त्याच्यावर यापूर्वीचा २००९ मधील वेलतूर येथील खुनाचा गुन्हा दाखल असून त्यातून त्याची निर्दोष सुटका झाली होती, त्यानंतर पोलिसांनी दुर्गेश चौधरी याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने अरमान याच्या खुनाची कबुली दिली. त्याशिवाय त्यापूर्वी एप्रिल २०१७ मध्ये कैलाश पुनाराम नागपुरे (२८) रा. देशपांडे ले-आऊट याचा कामठी परिसरात त्याच पद्धतीने खून केला. काही दिवसांनी पुन्हा आरिफ मुन्न्ो अंसारी (१७) रा. गौरीशंकरनगर, नाका याचा दगडाने ठेचून खून केला. त्याची ओळख अद्याप पटायची आहे. त्याने अनेक ठिकाणी चोरी व घरफोडय़ा केल्या.

पोलिसांनी सर्व खुनांची साखळी जोडली असता त्यांना काही गोष्टी समजल्या. त्यात आरोपीला दारूचे व्यसन आहे आणि अनैसर्गिक कृत्यासाठी अशाप्रकारचे खून करीत असल्याची माहिती समोर येत आहे. कैलाश आणि आरोपीची ओळख मध्यवर्ती कारागृहातच झाली होती. आरोपीच्या आईवडिलांचा मृत्यू झाला असून त्याला एक बहीण आहे. ती विवाहित असून तो तिच्याकडे कधीच जात नाही. त्यामुळे तो दारू पिऊन मिळेल त्या ठिकाणी राहत होता. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात लकडगंज पोलिसांनी केली.

पत्नीही सोडून गेली

आरोपी हा विवाहित आहे. मात्र, तो अनैसर्गिक कृत्य करीत असल्याने शेवटी कंटाळून त्याची पत्नीही त्याला आठ वर्षांपूर्वी सोडून गेली. तेव्हापासून तो मुलांना दारू व इतर व्यवसायाची सवय लावून त्यांना आपल्या जाळयात ओढत होता. त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडीचे जवळपास ३१ गुन्हे दाखल आहेत.

डीएनए चाचणीवरून मृताची ओळख

मालधक्का परिसरातील मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्याच्या आईवडिलांनीही कपडे व साहित्य हे आपल्या मुलाचे असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी शवविच्छेदनादरम्यान त्याचा व्हिसेरा जतन करून ठेवला होता. त्यानंतर त्याच्या आईवडिलांची डीएनएन चाचणी घेतली. त्यावरून मृत मुलगा हा त्यांचा असल्याची ओळख पटली. मृत मुलगा व त्याचे आईवडील मूळ बिहारचे असून ते कामानिमित्त नागपुरात भाडय़ाने राहात होते. अरमान हा वडिलांसोबत शिंपीकाम करायचा.