सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील प्रकार

नागपूर : सुपरस्पेशालिटी रुग्णालयात एक उद्वाहन (लिफ्ट) डॉक्टरांसह इतर अधिकाऱ्यांसाठी आरक्षित आहे. रुग्णासाठीच्या एका उद्वाहनावर भार वाढल्यास डॉक्टरांचे उद्वाहन रिकामे असतानाही रुग्णांसाठी त्यांचा वापर न होत नाही. यामुळे त्यांना नाहक वेठीस धरले जात आहे. गुरुवारी हा प्रकार समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात तीन उद्वाहन असून त्यातील एक गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. ते दुरुस्त केले अथवा बदलले जात नाही. शिल्लक दोनपैकी एक उद्वाहन डॉक्टरांसाठी तर एक रुग्णांसाठी वापरले जाते. येथे क्षमतेहून जास्त रुग्ण येत असून त्यात अत्यवस्थ रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णांना स्ट्रेचरवर वरच्या माळ्यावरील विविध वार्डातून उद्वाहनावर तळ मजल्यापर्यंत आणल्यास पुन्हा वर पाठवावे लागते. रुग्णांसाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे उद्वाहनात रुग्णांना प्राधान्य अपेक्षित असताना डॉक्टरांचे उद्वाहन वापरात नसतानाही ते रुग्णांना दिले जात नाही. गुरुवारी पुन्हा असा प्रकार समोर आला.

दुपारी एकच्या सुमारास येथील उद्वाहनावर एकाच वेळी तीन रुग्ण स्ट्रेचरवर आले. यापैकी एका रुग्णाला उद्वाहनातून वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान शेजारील डॉक्टरांसाठीचे उद्वाहन रिकामे असतानाही ते रुग्णांना दिले गेले नाही. रुग्ण एक-एक करत वर पाठवले जात असल्याने शेवटच्या रुग्णाला वार्डात जायला तब्बल ३० ते ४० मिनिटे लागले. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी डॉक्टरांच्या उद्वाहनात हवा खेळती राहत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यात रुग्णाचा श्वास गुदमरण्याचा धोका वर्तवला. प्रत्यक्षात या उद्वाहनात पंखा आहे. सोबत जनरेटरचेही बॅकअप आहे. त्यामुळे वीज गेल्यास रुग्णाला खाली-वर नेता येते. परंतु त्यानंतरही रुग्णाला मन:स्ताप दिला जात असल्याने प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या विषयावर सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

वैद्यकीय सचिव लक्ष घालणार काय?

राज्याचे वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी यांचे वडील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्यांना बघण्यासाठी अधून-मधून तेही येथे येतात. येथील इतर रुग्णांना उद्वाहनाच्या समस्येमुळे प्रचंड मन:स्ताप होत आहे. त्यामुळे ते तातडीने ही समस्या सोडवणार काय? याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.