मंगेश राऊत

वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचा राज्यात मोठा गोंधळ उडाला आहे. मराठा आरक्षण लागू करण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणालाही न्यायालयात आव्हान दिल्याचे कारण सांगून प्रवेश प्रक्रिया स्थगित केली आहे. अशा परिस्थितीत एमबीबीएस आणि बीडीएसची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून भविष्यात विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारा प्रत्येक जिल्हा पातळीवर सेतू तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

दंतवैद्यक व वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये मराठा आरक्षण यंदा लागू होणार नाही, असे आदेश उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीईटीला २५ मे ची मुदत घालून देण्यात आली. त्यानुसार सीईटीने प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला. पण, निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढून महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी अतिशय अल्प वेळ दिला आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त प्रकाशित केले असता सीईटीने धनाकर्ष व धनादेश असे दोन पर्याय दिले. दुसरीकडे आर्थिक दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) प्रवेश प्रक्रियेत आरक्षण देण्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानंतर सीईटीने सात दिवसांकरिता प्रवेश प्रक्रिया स्थगित केली. ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होताच तारांबळ उडून विद्यार्थ्यांची धावपळ होणार, हे निश्चित आहे. आता एमबीबीएस आणि बीडीएस या पदवी अभ्यासक्रमासाठीही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ती प्रक्रियाही न्यायालयीन कचाटय़ात अडकू शकते, ही बाब लक्षात घेऊन आणि पदव्युत्तरपेक्षा पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते, हा विचार करून सीईटीने जिल्हा पातळीवर सेतू केंद्राचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्यांचे अधिष्ठाता व संबंधितांसोबत १६ व १७  मेला बैठक बोलावण्यात आली असून त्यात हा विषय मंजूर करून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

असे असेल सेतू केंद्राचे स्वरूप

एचडीएफसी बँकेच्या मदतीने हे सेतू केंद्र जिल्हा पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. येथे नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक दस्तऐवज व विद्यार्थ्यांकडून स्वीकारवयाचे शुल्क याची माहिती यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध झाली व त्यांनी आपले महाविद्यालय निवडल्यावर आपल्या जिल्हय़ातील सेतू केंद्रात शुल्काचा धनाकर्ष किंवा धनादेश आणि प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज केंद्रातील अधिकाऱ्यांना सादर करावे लागतील. दस्तऐवज स्कॅन करून सीईटी सेल व महाविद्यालयाला ऑनलाइन पाठवले जातील. त्या आधारावर संबंधित महाविद्यालयात भरण्यात आलेल्या जागा व रिक्त जागा ऑनलाइन बदलण्यात येतील. दरम्यान, कुणी विद्यार्थ्यांने दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत महाविद्यालयात बदलण्याचा निर्णय घेतला तर त्याला सेतू केंद्रावर संपर्क करून दस्तऐवज परत घेता येतील. नवीन महाविद्यालयासाठी सेतू केंद्रावरच पूर्वीप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल. सर्व प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे दस्तऐवज सेतू केंद्राकडून महाविद्यालयांना पाठवण्यात येतील.

सेतू केंद्राबाबत लवकरच निर्णय

पदव्युत्तरप्रमाणे एमबीबीएस, बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. कुठल्याही अनपेक्षित कारणांमुळे त्या विद्यार्थ्यांची धावपळ होणार नाही, या उद्देशाने जिल्हा पातळीवर सेतू केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. महाविद्यालय व सरकारशी चर्चा करूनच त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

– आंनद रायते, आयुक्त, सीईटी.