शहर, ग्रामीण भागात आठ रुग्णालयात सातशे खाटा उपलब्ध

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर :  शहर व ग्रामीण भागात सुमारे आठ आयुर्वेद आणि होमिओपॅथी रुग्णालय व महाविद्यालयात सातशेच्या जवळपास खाटा उपलब्ध आहेत. तरीही प्रशासनाकडून या रिकाम्या  रुग्णालयांना  कोविड रुग्णालय करण्याचा विचार का केला जात नाही, असा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात उपस्थित केला जात आहे.

नागपुरात रोज दीड ते दोन हजार नवीन बाधितांची भर पडत असून ४५ ते ६० मृत्यू होत आहेत. येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनच्या खाटा कमी पडत असल्याने  रुग्णांना ताटकळत रहावे लागत आहे. या स्थितीत प्रशासनाने तातडीने ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध करायला हव्या. परंतु महापालिका प्रशासन केवळ खासगी रुग्णालयांना त्यांचे रुग्णालय कोविड रुग्णालयांत परावर्तीत करण्यासाठी शक्ती खर्ची घालत आहे. सध्या  शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री आयुर्वेद कॉलेज, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, पांडव आयुर्वेद कॉलेज, ज्युपिटर आयुर्वेद कॉलेज, बुटीबोरीतील मुळक आयुर्वेद कॉलेज, दाभ्यातील आंतरभारती आयुर्वेद महाविद्यालय, नंदवनमधील बंद पडलेले नागपूर होमिओपॅथी कॉलेजमध्ये ७०० खाटा उपलब्ध आहेत.

या रुग्णालयांत ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरची सोय केल्यास  तातडीने बाधितांवर उपचार सुरू होणे शक्य आहे. यापैकी दोन-तीन महाविद्यालयांना प्रशासनाने कोविड केअर सेंटर करण्याबाबत नोटीस दिली आहे. परंतु त्यावरही  पुढची कारवाई होत नाही. प्रशासनाकडून आता जम्बो  रुग्णालय उभारण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी अद्यापही  प्रक्रिया सुरू झाली नाही.  यासाठी प्रशासनाला बराच अवधी लागणार आहे. उलट या आधीच खाटांची सोय असलेली ही रुग्णालये जास्त उपयुक्त ठरू शकतात. या विषयावर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

उपलब्ध खाटा

नागपूरच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांत सुमारे १६५ खाटा, श्री आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात १५०, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालयात (नंदनवन) ७०, पांडव आयुर्वेद महाविद्यालयात ६०, ज्युपिटर आयुर्वेद महाविद्यालयात ४०, बुटीबोरीतील मुळक आयुर्वेद महाविद्यालयात ८० खाटा उपलब्ध आहेत. दाभातील आंतरभारती होमिओपॅथी कॉलेजला ५० तर बंद पडलेल्या नागपूर होमिओपॅथी कॉलेजला ५० खाटांची सोय आहे. बंद पडलेल्या नागपूर होमिओपॅथी कॉलेजमध्ये  एक सभागृह असल्याने येथेही मोठय़ा संख्येने खाटांची सोय होणे शक्य आहे.

करोना उपचाराची यंत्रणा उभारताना  इंडियन मेडिकल असोसिएशन व डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर समस्यांचे प्रमाण कमी करता आले असते. आयएमएकडून हा मुद्दा  उपस्थित केल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आताही  या महाविद्यालयांत रुग्ण कमी असल्याने तेथील रिकाम्या खाटा वापरणे शक्य आहे.  सोबत या महाविद्यालयातील डॉक्टरही मदतीसाठी मिळू शकतील.

– डॉ. अशोर आढव,  पेट्रन, आयएमए (राज्य शाखा)