९३ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल

निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची सन २०१६ते २०१८ या तीन वर्षांतील थकबाकी केव्हा मिळणार, असा सवाल ९३ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी वा.नि. देशपांडे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून मिळू लागला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी २०१६ ते २०१८ या दरम्यानची थकबाकी पाच वर्षांत समान हप्त्यात रोखीने दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणते पाच वर्षे, कोणता महिना याबाबत काहीच स्पष्ट केले नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संभ्रमात सापडले आहेत. किमान एक वर्षांची तरी थकबाकी तरी मिळावी, अशी अपेक्षा देशपांडे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

पूर्वी ८० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निवृत्ती वेतन सरसकट मिळत होते. आता यात सुधारणा करण्यात आली. आता वयोमर्यादेचे पाच टप्पे (८०, ८५, ९०, ९५ आणि १००) करण्यात आले. त्यांनाच वाढीव दराने निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. महागाई भत्ता ३ टक्के दराने १ जुलैपासून निवृत्ती वेतनासोबत मिळणार असल्याचे व जानेवारी ते जून २०१९ या दरम्यानची थकबाकी नंतर देणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले असले तरी ते नेमके केव्हा देणार, याबाबत मात्र त्यांनी काहीही सांगितले नाही, याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांनी वृद्ध सेवानिवृत कर्मचाऱ्यांना किमान एक वर्षांची तरी थकाबाकी रोखीने द्यावी, अशी विनंती देशपांडे यांनी केली आहे.