दहन ओटय़ांवर खड्डे, टिनाच्या छतालाही गळती

शांतीनगर घाटावर मृतदेह दफन करण्यासाठी अपुरी जागा, त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी, दहन ओटय़ाची झालेली दुरवस्था आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना प्रचंड मन:स्तापाला तोंड द्यावे लागते.

उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांना शांतीनगर घाट जवळ पडतो. तेथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा, महापालिकेकडून केला जातो, परंतु तेथे पाहणी केली असता सुविधांच्या नावाने बोंब असल्याचे दिसून येते. अंत्यसंस्कारासाठी बांधण्यात आलेल्या ओटय़ांवरील टिन जीर्ण झाल्या असून त्याला छिद्र पडले आहे. ८ पैकी दोनच ओटे २ नवीन आहे. उर्वरित ओटय़ांवर खड्डे पडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट पेटत्या सरणावर पडते. पावसाचा जोर अधिक असल्यास अंत्यविधीतच व्यत्यय येतो. ओटय़ांवर पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांमुळे सरण रचता येत नाही.

घाट परिसरात ठिकठिकाणी मृतदेहावरील फुले व कपडे पडलेले असतात. नियमित स्वच्छता केली जात नसल्याने दरुगधीचीही समस्या आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथे शुद्धीकरण यंत्र लावण्यात आलेले आहे, हे विशेष.

दफनासाठी अपुरी जागा

मृतदेह दफन करण्यासाठी जागा अपुरी पडते. एकदा मृतदेह दफन केल्यास त्याच जागेवर किमान वर्षभर दुसरा दफनविधी करता येत नाही. त्याच्यासाठी दुसरी जागा शोधावी लागते, त्यासाठी पुरेशी जागा नाही. खड्डे खोदायला महापालिकेचे कर्मचारी नाही. बाहेरून माणसे आणावी लागतात. हा भाग खोलगट परिसरात आहे. पावसाळ्यात तेथे पाणी साचते. त्यामुळे दफनविधी करायचा कोठे, असा प्रश्न पडतो.

मोकाट श्वानांचा सुळसुळाट

शांतीनगर घाटावर मोकाट श्वान आणि पाळीव कोंबडय़ांचा सुळसुळाट दिसून येतो. अंत्यविधी दरम्यान ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी त्यांची झुंबड उडते, अशावेळी ते चावण्याचाही धोका असतो.

असामाजिक तत्त्वांचा वावर

महापालिकेने ३ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. रात्रीला या भागात असमाजित तत्त्वांचा वावर असतो, मद्यप्राशन आणि इतरही अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची संख्या येथे अधिक आहे. घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने मद्यपी भिंतीच्या आडोशाला बसतात. त्यांना तेथून हुसकावून लावावे व सुरक्षा वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.

घाटावर अतिक्रमण

शांतीनगर घाट परिसर पूर्वी मोठा होता, परंतु तेथे झालेल्या अतिक्रमणामुळे जागा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेकांनी अतिक्रमण करून घरे सुद्धा बांधली आहेत. अतिक्रमणातून घाट मुक्त करावा, अशी मागणी आहे.

सुरक्षा भिंतीला तडे

घाटाला लागून नागरी वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी लोकांनी घाटाच्या सुरक्षा भिंती तोडल्या आहेत. त्यामुळे भिंतीला तडे पडले असून मोकळ्या जागेतून मोकाट प्राणी आतमध्ये प्रवेश करतात.