‘शरद जोशी-शोध अस्वस्थ कल्लोळाचा’च्या निमित्ताने कार्यक्रम

शरद जोशी म्हणजे शेतकऱ्यांचा कैवारी,  शेतकऱ्यांची संघटना, एवढीच त्यांची ओळख सर्वसामान्य माणसाला आहे. मात्र, शरद जोशी म्हणजे ‘एन्सायक्लोपिडीया’, शेतकऱ्यांचे विद्यापीठ, विचार-तर्काना पक्का असणारा माणूस, असे त्यांचे विविधांगी पैलू फारच थोडय़ा लोकांना माहिती आहे. असेच काही पैलू वसुंधरा काशीकर-भागवत आणि गजानन अमदाबादकर यांनी ‘शरद जोशी-शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमातून उलगडले.

विदर्भ साहित्य संघ व राजहंस प्रकाशन यांच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात या पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत आणि शरद जोशींचे निकटवर्तीय गजानन अमदाबादकर यांनी सुमारे दोन-अडीच तासाच्या कार्यक्रमातून शरद जोशींच्या या विविधांगी पैलूंचा उलगडा केला. शरद जोशी माणूस म्हणून कसे होते हे फार थोडय़ा लोकांना माहिती आहे, पण त्यांना पाहिल्यावर एक प्रचंड ऊर्जा जाणवते. एक चालताबोलता ‘एन्सायक्लोपिडिया’ म्हणजे शरद जोशी असल्याचे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी सांगितले. त्यांची शेतकरी संघटना म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठ, ज्या विद्यापीठाने शेतकरी घडवला आहे. शुद्ध मराठीत सांगायचे तर शेतकऱ्यांना त्यांनी अर्थसाक्षर बनवले आहे. पाच भाषांवर त्यांचे प्रभूत्त्वच नव्हे तर या भाषंमधील ते वाङ्मय पंडित होते. त्यांचे असेच अनेक पैलू या पुस्तकातून उलगडण्याचा प्रयत्न केल्याचे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्राने शरद जोशींवर अन्याय केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

शरद जोशींनी त्यांचे आयुष्य आगीत टाकले आणि त्यापाठोपाठ त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आणि असे शरद जोशी मी अनुभवले आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणाच्या प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्य़ावर होती, अशी आठवण गजानन अमदाबादकर यांनी सांगितली. १९७२च्या काळात अन्नाच्या दाण्यासाठी परका झालेला माणूस नंतर समृद्ध झाला तो शरद जोशींमुळे आणि त्याचे बक्षीस म्हणून शरद जोशींना कर्जाचे गाठोडे मिळाले. अशा या व्यक्तिमत्त्वासोबत राहणे म्हणजे आयुष्याचे सार्थक होते. कारण याच व्यक्तीमुळे, शेतकरी चळवळीतून स्त्री जातीबद्दल ओलावा निर्माण झाला. शरद जोशी अखेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, पण सरकार नावाची संस्था कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली नाही, अशी खंत गजानन अमदाबादकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश सब्जीवाले यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे राम नेवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.