विधानसभेतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्ष विस्तारासाठी पुन्हा एकदा विदर्भावर लक्ष केंद्रित केले असले तरी जुन्या व प्रामुख्याने पराभूत नेत्यांच्या बळावर त्यांना विदर्भात यश मिळण्याची शक्यता कमीच आहे.

संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर व अमरावतीतील कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पवार दोन दिवस विदर्भात होते. या दोन्ही मेळाव्यांना कार्यकर्त्यांची गर्दी कमीच होती. या पक्षाचे नेतेच नाही, तर कार्यकर्तेसुद्धा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नसल्याचे चित्र या मेळाव्यात दिसले. स्वतंत्रपणे लढणाऱ्या राष्ट्रवादीला विधानसभेत विदर्भातून केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे आमदार मनोहर नाईक व विधान परिषदेच्या चार आमदारांच्या बळावर पक्षविस्तार शक्य नाही, याची जाणीव असल्याने पवारांनी स्वत: पुढाकार घेतला असला तरी केवळ पराभूतांच्या बळावर हा पक्ष विदर्भात यश संपादन करणे कठीण असल्याचे चित्र सध्या तरी आहे.

स्वतंत्र विदर्भावर सोयीस्कर भूमिका

निवडणुकीच्या काळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून कोलांटउडी मारणारे पवार या वेळी पुन्हा लोकांची इच्छा असेल, तर राज्याला विरोध नाही, हा जुनाच राग आळवताना दिसले. स्वतंत्र राज्याची मानसिकता जोपासणाऱ्या मोठय़ा वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न यातून दिसून आला. विदर्भात दलित व आदिवासी मतांची संख्या लक्षणीय आहे. ही मते कधीच राष्ट्रवादीच्या पारडय़ात पडत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. या वेळच्या दौऱ्यात पवारांनी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द नको, तर त्याचा गैरवापर थांबला पाहिजे, असे विधान प्रत्येक भाषणात जाणीवपूर्वक करून या मतांना जवळ करण्याचा प्रयत्न केला.

सवलती व कर्जमाफी देऊनही शेतकरी आत्महत्या का थांबत नाही, असा प्रश्न करत एक वर्षांपूर्वी या प्रश्नाचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी विदर्भ दौरा करणारे पवार या वेळी या मुद्दय़ावर फारसे बोललेच नाहीत. उलट, त्यांनी पहिली कर्जमाफी देणारा मी होतो, याची आठवण प्रत्येक भाषणात करून दिली. राज्यातील युती सरकारवर टीका करणाऱ्या पवारांनी या सरकारने आणलेल्या भूसंचय योजनेला विरोध केला.

सरकारवरचा विश्वास उडाल्यानेच मराठा मोर्चे निघत आहेत, असे सांगणाऱ्या पवारांनी या दौऱ्यात त्यांच्या साथीदारांकडून विदर्भात निघत असलेल्या मोर्चाची बारीकसारीक माहिती घेतली. विदर्भात कुणबी विरुद्ध मराठा, असा वाद निर्माण होणार का, या प्रश्नाची चाचपणी आडून आडून करणाऱ्या या नेत्याने अधिकृतपणे मात्र या मोर्चाशी पक्षाचा काही संबंध नाही असेच प्रत्येक ठिकाणी ठासून सांगितले.

नव्या नेतृत्वाला संधी नाही

  • आधी काँग्रेस व इतर पक्षात असलेले तेच जुने नेते राष्ट्रवादीचा गाडा हाकत असल्याचे चित्र अनेक वर्षांपासून आहे.
  • हे जुने नेते नव्या नेत्यांना समोरही येऊ देत नाही. त्यामुळे पक्षात साचलेपण आले आहे. आता याच नेत्यांना सोबत घेऊन पवारांना यश कसे मिळेल हा प्रश्न या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झाला आहे. हा पक्ष सत्तेत असताना विदर्भातील काही स्थानिक संस्थांत सत्तेवर होता. आता तीही सत्ता गेलेली आहे.
  • विधानसभेच्या वेळी प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने या भागात तर पक्षाची अवस्था बिकट आहे. अशा स्थितीत केवळ युती सरकारच्या खराब कामगिरीची वाट बघणेच राष्ट्रवादीच्या नशिबात असल्याचे या दौऱ्याच्या वेळी स्पष्टपणे जाणवले.
  • कधी काळी पवारांसारख्या जाणत्या नेत्याचा दौरा या प्रदेशात राजकीय खळबळ उडवणारा ठरायचा. या वेळी तर तेही दिसले नाही. गुलाबराव गावंडे व सुरेखा ठाकरे हे जुनेच पराभूत नेते पवारांच्या भेटीसाठी व नंतर पक्ष प्रवेशासाठी इच्छुक दिसले. या जुन्या नेत्यांच्या बळावर राष्ट्रवादीला विदर्भात भविष्यात यश मिळण्याची शक्यता कठीण आहे.