राज्याला विदर्भातील मुख्यमंत्री लाभल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दुष्काळाच्या प्रश्नावर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. विदर्भातील सर्वाधिक प्रकल्प गैरव्यहारामुळे रखडले आहेत. यामुळे धरणे भरली असताना पाण्याअभावी पिके मरणासन्न अवस्थेत आहेत, असे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर जेमतेम ११ महिन्यांच्या सरकारवर कोरडे ओढण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला वैदर्भीय जनता साथ देते की जनक्षोमाला सामोर जावे लागेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विशेषत: पश्चिम विदर्भात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पावसाच्या लहरीपणामुळे आधीच उशिरा पेरण्या झाल्या आणि आता शेतातील उभे पीक वाचवण्याचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. राज्य सरकार कर्जमाफीच्या भानगडीत न पडता दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे आश्वासन देत आहेत. वास्तवित पाहता विरोधी पक्षांसाठी ही योग्य संधी आहे. पंरतु दीड वर्षांपूर्वी केंद्रातील कृषी मंत्री आणि सुमारे वर्षभराआधी राज्यात सिंचन खात्याचे मंत्री असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक आक्रमक होऊन शेतकऱ्यांची कीव करणे हे येथील जनतेला भावते की त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील काही गावांना शरद पवार भेटी देणार आहेत. एकेकाळी कापूस ब्रिटनला पाठवणारा हा जिल्हा दोन दशकांहून अधिक काळापासून शेतकरी आत्महत्येमुळे चर्चेत आहे. यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षांतील प्रमुख नेते या जिल्ह्य़ाला भेटी देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांपुढील समस्या सुटल्या नाही आणि आत्महत्याही थांबलेल्या नाहीत. यंदाही पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. पश्चिम विदर्भातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे न संपणारे सत्र या पाश्र्वभूमीवर पवारांचा हा दौरा होत आहे.
विदर्भात नदी, नाल्यांचे प्रमाण अधिक आहे. योग्यवेळी धरणांची कामे पूर्ण झाली असती तर दुष्काळाची झळ कमी असती. परंतु बहुतांश सिंचन प्रकल्प भ्रष्टाचाराने पोखरले गेले आहेत. येथील विविध प्रकल्पांमध्ये सुमारे ७२ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील बेंबळा प्रकल्प, भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द धरणात भरपूर पाणी आहे. कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने पाणी शेतापर्यंत पोहोचले नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जबाबदार असल्याची जनभावना आहे. सुभेदारांचा पक्ष म्हणून ओळख निर्माण झालेल्या राष्ट्रवादीचा यानिमित्ताने पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न देखील असू शकतो. परंतु सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या नेत्यांचा सहभागाविषयीचे आरोप आणि त्यामुळे पक्षाची मलिन झालेली प्रतिमा यामुळे राष्ट्रवादीच्या दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांचा दौऱ्याला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.