कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखअसलेल्या विदर्भात विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी (१२ डिसेंबरला) नागपुरात निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, मोर्चात पक्षातील सर्व गट-तट सहभागी व्हावे म्हणून पक्षातील ज्येष्ठ नेतेही प्रयत्नशील आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात येथील नाराज नेत्यांशी केलेली चर्चा हा याच प्रयत्नाचा एक भाग मानला जात आहे.

पक्षाच्या अडचणीच्या काळात कायम काँग्रेससोबत राहणारा भूप्रदेश म्हणून विदर्भाची ओळख होती. १९७७च्या जनता लाटेतही विदर्भाने काँग्रेसला साथ दिली. मात्र, कालांतराने भाजप व शिवसेनेने या भागात मुसंडी मारली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या जवळजवळ सर्वच निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशेची भावना निर्माण करून गेली. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या एकहाती विजयाने संघटितपणे प्रयत्न केले तर भाजपचा पराभव शक्य आहे, अशी भावना राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केली. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याही लोकप्रियतेत वाढ झाल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. ते टिकवून ठेवणे आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघटितपणे लढा उभारून आव्हान निर्माण करणे यासाठी राज्यात काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. १२ डिसेंबरच्या सरकार विरोधातील मोर्चाकडे याच नजरेने पाहिले जात आहे.

काँग्रेसच्या मार्गात पक्षातील गटबाजी हा मोठा अडथळा आहे. तो दूर कसा करता येईल, यावर ज्येष्ठ नेत्यांचे चिंतन सुरू आहे. नाराज नेत्यांची समजूत घालून त्यांना मोर्चात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केल जात आहेत.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अलीकडेच नागपुरातील नाराज नेते नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांनी नागपुरात भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत मोर्चाची चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही बाब फेटाळली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आता विदर्भातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेससाठी मोर्चा प्रतिष्ठेचा

मोर्चाच्या निमित्ताने विदर्भात काँग्रेसला शक्तिप्रदर्शन करायचे आहे. हा मोर्चा सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा असला तरी मोठा भाऊ म्हणून काँग्रेसनेच यासाठी अधिक पुढाकार घेतला आहे. पक्षाचे विदर्भात गावपातळीपर्यंत नेटवर्क आहे. इतर पक्षांकडे ते नाही. त्यामुळे गर्दी काँग्रेसलाच जमवावी लागणार आहे. २०१५ मध्ये चव्हाण यांच्याच नेतृत्वात निघालेला मोर्चा भव्य होता. त्याहीपेक्षा मोठा मोर्चा असावा, यादृष्टीने प्रयत्न आहेत. राष्ट्रवादीचाही या मोर्चात सहभाग असला तरी या पक्षाकडे कार्यकर्त्यांऐवजी नेतेच अधिक आहेत. त्यामुळे काँग्रेसची जबाबदारी वाढली आहे.

राहुल गांधींना निमंत्रण

१२ डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहावे म्हणून काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह इतरही प्रमुख विरोधी पक्षांच्या या संयुक्त मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करणार आहेत. काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांचा याला विरोध होता. विदर्भातील राष्ट्रवादीची मर्यादित ताकद लक्षात घेता मोर्चाचा त्यांनाच फायदा होईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधी यांना बोलावण्याचे ठरवले आहे.