News Flash

यूटय़ुबवर ‘शार्प एमर्स’ चलचित्रफितीची धूम

दोघांनीही आईवडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी ‘जे काही करायचे ते स्वबळावर करा’ असा सल्ला दिला.

वेदज्ञ वकील

नागपूरकर ईशान व वेदज्ञची कलाकृती

नागपूर : उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये काय करायचे.. हा चिमुकल्यांना पडणारा प्रश्न! यातले काही त्यांना आवडणारे छंदवर्ग लावतात, तर कुणी शिबिरात सहभागी होतात. मात्र, शहरातल्या दोन चिमुकल्यांनी उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये केलेली कामगिरी भल्याभल्यांना चकित करणारी आहे. यूटय़ुबवर एक वाहिनी तयार करून त्यावर स्वत: तयार केलेली चलचित्रफित टाकली. त्यांची ‘शार्प एमर्स’ या चलचित्रफितीने सध्या समाजमाध्यमात धूम केली आहे.

चिमुकल्यांची मजल टीव्ही आणि त्यावरील कार्टून इथपर्यंतच असते. ईशान सोनार आणि वेदज्ञ वकील यांना आपण स्वत:ची वाहिनी यूटय़ुबवर का निर्माण करू नये आणि त्यासाठी लागणारी चलचित्रफित आपण स्वत: का तयार करू नये, असा एक विचार मनात आला. त्यांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली. दोघांनीही आईवडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी ‘जे काही करायचे ते स्वबळावर करा’ असा सल्ला दिला. मग ७ एप्रिलपासून ईशान आणि वेदज्ञची शोधमोहीम सुरू झाली. चलचित्रफित, छायाचित्रणाचे धडे त्यांनी स्वबळावर घेतले. चलचित्रफितीचे संपादन कसे करायचे हे शोधले. त्याचा अभ्यास केला.

वाहिनी आणि चलचित्रफितीसाठी आर्थिक पाठबळ लागणार होते. त्यासाठी प्रायोगिक चलचित्रफित तयार करून आजीला दाखवली. त्यांची ही कलाकृती पाहून आजीकडून त्यांना ‘ट्रायपॉड’ मिळाला. मग लोगो कसे करतात, यासाठीचे सॉफ्टवेअर त्यांनी शोधले. चलचित्रफितीचे संपादन करण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्ट’या सॉफ्टवेअरचा वापर त्यांनी केला. जवळ आणि दूरचे चित्र कसे दाखवायचे हेही त्यांनी प्रयत्नातून साध्य केले. तब्बल महिनाभराच्या सरावानंतर अवघ्या तीन दिवसात त्यांनी व्हिडिओ तयार केला.  विशेष म्हणजे, दोघांच्याही यूटय़ुबवरील वाहिनीला स्टँडर्ड यूटय़ुबचा परवाना मिळाला आहे.

नेमबाजीचा खेळ

आपण एक वाहिनी तयार करू असा विचार आला. यूटय़ुबवरील चलचित्रफित पाहताना आपणही ती तयार करू शकतो, असे जाणवले. ‘अ‍ॅडॉब’ची जुनी आवृत्ती नि:शुल्क असल्यामुळे त्या माध्यमातून आम्ही चलचित्रफितीचे संपादन केले. क्रीडा क्षेत्राची संबंधित ‘शार्प एमर्स’ ही चलचित्रफित आम्ही तयार केली. हा एकप्रकारे नेमबाजीचा खेळ आहे. एक महिन्यापासून आम्ही सराव केला, म्हणूनच आम्हाला अवघ्या तीन दिवसात हे काम पूर्ण करता आले. सर्व चित्रीकरण आम्ही डीएसएलआर, निकॉन डी फाईव्ह, तसेच एचटीसी  भ्रमणध्वनीच्या माध्यमातून केले.      – ईशान आणि वेदज्ञ

ईशान हा सोनाली कोलारकर व सुनील सोनार यांचा मुलगा आहे. तो मुंडले पब्लिक स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे, तर वेदज्ञ हा श्रीश वकील आणि डॉ. स्वाती वकील यांचा मुलगा आहे. तो भारतीय कृष्ण विद्या विहारचा दहावीच्या विद्यार्थी आहे. स्वत: माहिती मिळवण्याकडे असलेला त्यांचा कल पाहून त्यांच्या आईवडिलांनाही आनंद झाला. त्यांच्यामुळे आम्हालाही बरेच काही शिकता आले, अशी प्रतिक्रिया ईशान व वेदज्ञच्या आईवडिलांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:21 am

Web Title: sharp emers documentary by nagpur kid get huge response on youtube channel
Next Stories
1 चौकशीच्या फेऱ्यात सिंचन प्रकल्प अडकले
2 विदर्भवाद्यांच्या मोर्चावर लाठीहल्ला
3 यवतमाळमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
Just Now!
X