जलतज्ज्ञ शिरीष आपटे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

पाण्याची मागणी आणि उपलब्धता यातील दरी भविष्यात वाढती लोकसंख्या आणि शहर विस्तारामुळे आणखी वाढणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. या पाश्र्वभूमीवर पाणी कपात टाळायची असेल तर पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी न करता पिण्यासाठीच व  काटकसरीनेच करणे आवश्यक आहे, असे मत जलतज्ज्ञ शिरीष आपटे यांनी व्यक्त केले.

आपटे यांनी आज शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. २००५ मध्येही पेंच धरण कोरडे पडल्याने शहराला एकदिवसा आड पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यावेळी आपटे पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहात होते. चौराई धरण बांधल्याने व कमी पाऊस झाल्याने सध्याही पेंच धरण कोरडे पडले आहे व शहरात एकदिवस पाणीपुरवठा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर भविष्यात शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे करावे, याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी काटकसर हा एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले. मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने आता पूर्वीइतके  पाणी आपल्याला पेंचमधून उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जितकी कपात झाली तेवढी भरून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण स्थानिक पातळीवरही काही प्रयत्न होणे आवश्यक आहे. सध्या  पेंचसह इतर नद्यांमधून शहराला जितके पाणी मिळते त्यापैकी चाळीस टक्के पाणी गळती किंवा चोरीमुळे वाया जाते. हा प्रकार थांबवण्याचे प्रयत्न ओसीडब्ल्यू आणि महापालिका करीत असले तरी त्याला अधिक गती देणे गरजेचे आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणात इतर कामांसाठी होणारा वापरही चिंतेची बाब आहे. एकीकडे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे त्याचा वापर वाहने स्वच्छ करणे, अंगणात टाकणे, झाडांना देणे असे चित्र बघायला मिळते. जोपर्यंत पुरवठा नियमित होतो तोपर्यंत याकडे कोणीच लक्ष देत नाही. पण जेव्हा साठाच संपतो तेव्हा पाण्याचे महत्त्व कळते.

२००५ मध्येही नागपुरात प्रथमच एकदिवसा आड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. तेव्हाही मृतसाठय़ातून पाणी सोडण्यास विरोध झाला होता. पण, अशा स्थितीत तोच एकमेव पर्याय उरतो. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरले तरच ते पुरेल. अन्यथा टंचाईला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही. पाण्यासाठी पर्यायी स्रोत म्हणून शहरातील तलावाकडे बघता येईल. भोसलेकालीन मोठय़ा सार्वजनिक विहिरीही आहेत. मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवना प्रमाणेच शहरातील तलावही पुनरुज्जीवित करता येऊ शकतात. यामुळे बाह्य़कामासाठी पाणी उपलब्ध होईल व पिण्याच्या पाण्यावरील भार कमी होईल, असेही आपटे म्हणाले.

पाणी कपात अन् प. महाराष्ट्रातील पूर

नागपूर शहरात होणारी पाणी कपात आणि त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात निर्माण होणारी पूरपरिस्थतीचा योगायोग याकडे आपटे यांनी लक्ष वेधले. २००५ मध्ये नागपुरात पाणी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात पूर आला होता. २०१९ मध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. हा योगायोग आहे की निसर्गचक्रामुळे असे घडले , याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे आपटे म्हणाले.

सौर ऊर्जेवरील योजनांचा पर्याय

ज्या भागात जलवाहिन्या नाहीत अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याऐवजी तेथील सार्वजनिक विहिरींवर सौरऊर्जेवर चालणाऱ्या छोटय़ा पाणी योजना सुरू केल्या तर पाणीटंचाईवर मात करता येईल. सौरऊर्जेचा वापर वाढवण्याचे विद्यमान सरकारचे धोरण आहे. त्याचाही फायदा याला होईल. वस्त्यांसोबतच मोठय़ा निवासी संकुलातही योजना करता येऊ शकतात. सरकारने त्या सुरू कराव्या व त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्थानिकांकडे सोपवावी, असे केल्यास स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळू शकते, असे आपटे यांनी सांगितले.