पोलिसांकडून अशी घटना घडल्याचा नकार

नागपूर : शिवसेना नेत्यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समित ठक्कर याच्या घरावर दगडफेक झाल्याची तक्रार त्याचा मोठा भाऊ रिषी ठक्करने ठराविक प्रसारमाध्यमांकडे केली आहे. पण, यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस सांदीपन पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा केला आहे.

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगजेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पेंग्विनशी तुलना करणारे ट्विट केले होते. याप्रकरणी शिवसैनिकांच्या तक्रारीवरून मुंबईत दोन आणि नागपुरात एक गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान त्याचा भाऊ रिषी ठक्कर याने ठराविक प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, रविवारी पोलिसांनी बंदोबस्त काढून टाकल्यानंतर त्यांच्या घरावर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यांचे कुटुंब वाहतूक व्यवसायात असून शिवसैनिक त्यांच्या व्यवसायातील लोकांनाही धमकावत असल्याचा आरोप केला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दिवसाढवळ्या खून होत असल्याचे त्यांचे म्हणणे असून जागरूक नागरिकाने आपले मत व्यक्त केले तर त्यात वाईट काय, असा सवाल केला आहे. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्याशी संपर्क साधला असता ठक्कर यांच्या घराभोवती पोलिसांचे बंदोबस्त आहे. त्यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडलेलीच नाही. अशी दगडफेक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क का साधला नाही, त्यांनी तक्रारही केली नसल्याचे सांगितले.

समित ठक्करला मुंबई पोलिसांकडून अटक

समित राकेश ठक्कर (३२), रा. बगडगंज याला सोमवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज करून सोमवारी त्याला अटक केली. अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर २६ ऑक्टोबरला त्याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो आजपर्यंत पोलीस कोठडीत होता.