स्वतंत्र विदर्भावर राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीची सभा
भाषेच्या मुद्यावरून स्वतंत्र विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने इतिहास तपासावा, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या राजवटीच्या काळात गुजरात, तामिळनाडू व ओदिशापर्यंत मराठी माणसांचे राज्य होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांची शनिवारी हिवरीनगरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अणे यांनी विदर्भाला विरोध करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
मराठी भाषेची दोन राज्य नको म्हणून ठाकरे बंधूंचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे. ठाकरेंना हिंदी येत नाही, त्यांनी या भाषेचे कौतूक करावे किंवा करू नये, वैदर्भीयांना हिंदीचा त्रास होत नाही. स्वतंत्र राज्याची सूत्रे शेटजी, भटजीकडे जातील, या म्हणण्यातही काही अर्थ नाही. विदर्भात मध्य भारताची संस्कृती रुळली आहे, महाराष्ट्राची नाही, असेही अणे म्हणाले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विदर्भ, मराठवाडय़ासह चार राज्यांची निर्मिती करावी, असे सुचविले होते. मुंबईसाठी हुतात्मे झालेल्यांची जशी आठवण केली जाते तशीच आठवण विदर्भासाठी प्राण देणाऱ्यांची का केली जात नाही, असा सवाल करून विदर्भाचे नेते नालायक आहेत, असे म्हणणाऱ्यांनीच विदर्भाचा निधी पळविला, अशी टीकाही त्यांनी केली.