हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपानं सभागृहाचं कामकाज बंद पाडलं होतं. तर दुसऱ्या दिवशी भाजपानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. यावेळी शिवसेनेचे आमदारांही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.

भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी भाजपा आमदार आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. याव्यतिरिक्त शिवसेने नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीदेखील मध्यस्थीचा प्रयत्न केला. शिवसेना भाजपा आमदार समोरासमोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि रवींद्र वायकर यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात घडलेला अत्यंत चुकीचा प्रकार होता. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणंदेखील चुकीचं आहे, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो, असंही ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतही गोंधळ घातला. तसंच विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी आपला शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.