आमदार बाळू धानोरकर यांचा घरचा अहेर

राज्यात आणि केंद्रात सेना सत्तेत असूनही  पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना  सेनेच्याच मंत्र्यांकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते, असा थेट आरोप करीत  शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी  पक्षाला घरचा अहेर दिला.

गुरुवारी नागपुरात शिवसेनेचा मेळावा झाला.  संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर यावेळी उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना आमदार धानोरकर यांनी शिवसेना मंत्र्यांचेच वाभाडे काढले. शिवसेनेचे विदर्भात संघटन नाही हे माहिती असताना सुद्धा पक्षाचा एकही मंत्री या भागाकडे लक्ष देत नाही. मग पक्ष कसा वाढेल, असा सवाल त्यांनी केला.  शिवसेनेचे मंत्री शिवसैनिकांचीच कामे करीत नाहीत. त्यामुळे सत्ता असूनही सेना विदर्भात माघारली आहे.

सेनेच्या १२ पैकी एकाही मंत्र्याचे जर काम असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. शिवसेनेच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का, याचाही कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे.

भद्रावतीचा किल्ला एकटय़ाने लढवला

भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत आपण एकटय़ाने किल्ला लढवला. मात्र एकही मंत्री या ठिकाणी प्रचाराला आला नाही. मंत्र्यांना निरोप दिले, त्यांनी वेळ दिली पण आले नाहीत, ही शिवसैनिकांची फसवणूक आहे, असे धानोरकर म्हणाले.

सत्तेतून बाहेर पडा

शिवसेनेचे मंत्री भाजप नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे सेनेने सत्तेतून पडावे तरच २८८ विधानसभेच्या आणि ४८ लोकसभेच्या जागा लढवू शकू आणि राज्यात व केंद्रात भगवा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.