संयुक्त महाराष्ट्रासाठी अध्यक्षांना स्मारकाची भेट

स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्यांच्या विरोधात निदर्शने

नागपूरच्या विधानभवन परिसरात शिवसेनेने मंगळवारी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या १०५ शहिदांसाठी उभारलेल्या हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती उभारली. स्मारकावर शिवसेनेच्या आमदारांनी पुष्पांजली वाहत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. शेवटी हे स्मारक सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने विधानसभा अध्यक्षांना भेट देण्यात आले. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा याप्रसंगी संतप्त शिवसैनिकांनी निषेध केला.

विधीमंडळाचे कामकाज सुरू असतांना दुपारी शिवसेनेच्या आमदारांनी अचानक विधानसभेच्या पुढे हुतात्मा स्मारकाची प्रतिकात्मक प्रतिकृती उभारली. स्मारकावर अखंड महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या १०५ शहिदांचे नाव लिहिले होते. आंदोलकांनी सर्वप्रथम स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे, महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या विदर्भवाद्यांचा धिक्कार असो, श्रीहरी अणेंचा धिक्कार असो, अखंड महाराष्ट्राचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, व्यर्थ न हो बलिदान अशा घोषणांसह आंदोलकांनी निदर्शने केली.

प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भावर वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन केले. त्याला काही दिवस जात नाही तोच श्रीहरी अणे यांनी पुन्हा औरंगाबाद येथे तसेच निवेदन दिले आहे. राज्याच्या मोठय़ा पदावरील व्यक्तीने हे विधान करणे गैरकायदेशीर असून त्यांची पदावरून हकालपट्टी करायला हवी. भाजपच्या काही आमदारांकडून वारंवार स्वतंत्र विदर्भावर बोलले जात असल्याने त्यांनी सभागृहात हा विषय मांडावा. परंतु तसे होत नसल्याने भाजपची  सभागृहात वेगळी आणि बाहेर वेगळी भूमिका दिसत असल्याचा टोला त्यांनी लावला.

सरनाईक म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र तोडण्याची भूमिका शिवसेना खपवून घेणार नसून, श्रीहरी अणे यांनी सभागृहात ते भाषण करण्याची मागणी पक्षाची आहे. तसे न केल्यास वारंवार शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. हे स्मारक विधानसभेच्या अध्यक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकरिता बलिदान देणाऱ्यांची आठवण करून देण्याकरिता भेट देत असल्याचे ते म्हणाले.

आंदोलनानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने हे स्मारक विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवण्यात आले. आंदोलनात ज्ञानराज चौगले, डॉ. सुजित मिनचेकर, मंगेश कुडाळकर, सुनील प्रभू, अर्जुन खोतकर, सुरेश गोऱ्हे, बाळू धानोरकर, अनिल कदम यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते.

देशमुखांची आदरांजली

स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक म्हणून आमदार आशिष देशमुख यांची ख्याती आहे. त्यांनी शिवसेनेच्या वतीने विधानभवन परिसरात उभारलेल्या प्रतिकात्मक हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.