News Flash

लोकसत्ता वृत्तवेध : ताकद मर्यादित तरीही नागपुरात शिवसेनेच्या बेटकुळ्या !

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत सेनेच्या नगरसेवकांची संख्या अवघी सहा आहे.

उत्तर प्रदेशात शिवसेना १५० जागा लढणार आहे.

राजकीय ताकद आधीच कमी, त्यातही अंतर्गत भांडणांनी कळस गाठलेला असताना शिवसेनेने मुंबईचा वचपा काढण्यासाठी नागपुरातील खड्डय़ांवर भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी हे कुरघोडीचे राजकारण हास्यास्पद वळणावर जाणारे आहे.

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत सेनेच्या नगरसेवकांची संख्या अवघी सहा आहे. पालिकेच्या राजकारणात कधीकाळी दोन आकडी संख्या गाठणाऱ्या सेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ सातत्याने कमी होत गेले व याला कारण, सेना नेतृत्वाचे मुंबईत बसून कारभार हाकणे हेच आहे. आताही पालिकेच्या स्थायी समितीत रस्त्यांच्या दर्जाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत शिवसेनेच्या नगरसेवकांचा सहभाग आहे. तेथे गप्प बसणारे हे नगरसेवक आता अचानक सक्रिय होण्यामागे मुंबईहून आलेला निरोप, हेच कारण आहे. एरवी महिनोंमहिने नागपूरकडे ढुंकूनही न बघणारे सेनेचे संपर्कप्रमुख अनिल परब आता दर आठवडय़ाला यायला लागले आणि शुक्रवारी त्यांनी भाजपवर आरोपांची राळ उठवून दिली. मुंबईतील खड्डय़ांची चौकशी करीत असाल, तर नागपूरच्याही करा, असाच अनिल परब यांचा पवित्रा यावेळी होता. असे आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याचा प्रयत्न सेनेने चालवला असला तरी यासाठी लागणारे राजकीय बळ सेनानेते कुठून आणणार, हा यातील कळीचा प्रश्न आहे.

या शहरात सध्या खड्डय़ांवरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत. ही पालिका भ्रष्टाचाराचे कुरण ठरली आहे. या आरोपातही तथ्य आहे. मात्र, त्याचा लाभ उठवण्याचा सेनेचा प्रयत्न राजकीय ताकद नसल्याने हास्यास्पद म्हणावा, असाच आहे.

राज्यात सत्तेत नसताना भाजपने व खुद्द मुख्यमंत्र्यांनी नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करा, अशी मागणी सातत्याने केली होती. आता बरखास्ती तर दूरच, पण या प्रन्यासला १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.

तेव्हाच नेमकी अंतर्गत वादावादी

अनिल परब ज्यावेळी हे आरोप करीत होते, त्याचवेळी सभागृहाबाहेर सेनेच्या दोन गटात अक्षरश: मारामारी सुरू होती. पत्रकार परिषदेच्या निमंत्रणात आमची नावे का नाही, हा या भांडणातील मुद्दा होता. शेखर सावरबांधे सेनेत असेपर्यंत हा पक्ष नागपुरात किमान चर्चेत तरी राहायचा, आता तेही उरलेले नाही, अशी सध्याची स्थिती आहे. सेनेचे विदर्भात चार आमदार आहेत. त्यापैकी नागपुरातील एकही नाही. जेव्हा युती होती, तेव्हा भाजपने सेनेला शहरातील एक जागा दिली, पण तेथेही सतत पराभवच पदरी पडत गेला.

बाहेरून पाठिंब्याच्या बळावर सेनेने सत्तेतील अनेक पदे आजवर भोगलेली आहेत. सेनेचे नगरसेवक सभागृहात बोलत नाहीत, पण त्यांचे नेते बाहेर आरोप करतात. हे सारे राजकीय हेतूने प्रेरित आहे.सध्या नागपुरात भरपूर विकास कामे सुरू आहेत. कुरघोडीच्या राजकारणाला किमान नागपुरात तरी स्थान नाही, हे या आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

प्रवीण दटके, महापौर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 12:51 am

Web Title: shiv sena preparation for nagpur election
Next Stories
1 ‘मुन्ना यादवविरुद्धचा तपास सीआयडीकडे सोपवा’
2 मुंबईच्या खड्डय़ांचा सेनेकडून नागपुरात वचपा
3 ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला हेल्मेट देतो’
Just Now!
X