उपजिल्हाप्रमुखासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : शिवसेना पदाधिकारी ट्रक चालकांना महामार्गावर अडवून खंडणी मागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मौदा पोलीस ठाण्यांतर्गत शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीने पुन्हा एकदा शिवसेना पदाधिकारी वादामध्ये सापडले आहेत.

रविनीश पांडे ऊर्फ चिंटू महाराज असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागण्यात येत असल्याचे आरोप अनेकदा होतात. पण, आता एका व्यापाऱ्याने पोलिसातच तक्रार दिली. राजेश दुलीचंद्र वैरागडे यांनी ही तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एमएच-३६, एए-३०२० क्रमांकाचे टिप्पर ट्रक आहे. हा ट्रक रविवारी वाळू भरून भंडाऱ्याकडून नागपूरच्या दिशेने येत होते. त्या ट्रकवर सुनील बारसू उरकुडे रा. परसोडी, भंडारा नावाचा चालक होता. रात्री १ वाजताच्या सुमारास मौदाजवळील माथनी टोल नाक्यावर दोन कार ट्रकला आडव्या झाल्या. यात काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा क्रिस्टा गाडीचा समावेश आहे. त्या कारमधून चार व्यक्ती उतरले व त्याने चालकाला गाडीखाली उतरवले. त्यांनी वाळू वाहून न्यायची असल्यास १ लाख रुपये देण्यास सांगितले. चालकाने आपल्याला मालकाशी संपर्क साधला. मालक एका तासाने घटनास्थळी पोहोचला असताना आरोपी चिंटू महाराजने स्वत:चा शिवसेना उपजिल्हा प्रमुख असल्याचे सांगितले व गाडीमध्ये वजनापेक्षा अधिक वाळू असून प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार न करण्यासाठी १ लाख रुपये मागितले. तसेच भविष्यात व्यवसाय करायचा असल्यास महिना बांधून घेण्यास सांगितले. वैरागडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला व वैरागडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी चिंटू महाराजसह इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांसमोर आरोपी निघून गेले

या घटनेनंतर वैरागडे यांची तक्रारच मौदा पोलीस नोंदवून घेत नव्हते. त्यावेळी सर्व आरोपी मौदा पोलिसांच्या समोर उभे होते. गुन्हा दाखल करायला घेत असताना आरोपी पोलिसांच्या समोरून निघून गेले. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांकडून नेहमीच खंडणी मागितली जात असून व्यावसायांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची गरज आहे.

– विदर्भ लोकल ट्रक असोसिएशन.