केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

पुण्याला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, नागपूरची ओळख केवळ मेट्रो, रस्ते, पूल एवढीच न राहता ती सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जावी. त्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण समारंभ नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उद्यान परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाल्याने आज शिवाजीनगर हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वाचे दैवत आहे. ते केवळ आदर्श राजा नाहीत तर ते आदर्श पिता होते. माझ्या घरात जशी आईवडिलांची प्रतिमा आहे तशी प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वकाही आहेत. येथे उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा हा सर्वाना प्रेरणा देणारा राहील. येणाऱ्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी उद्यानामध्ये डिजिटल वॉल तयार करून त्यावर माहितीपट दाखवावा, अशी सूचना गडकरी यांनी केली. सभापती संजय बंगाले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला खासदार अजय संचेती, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिवाजीनगरचे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर मुंडले, महापालिका आयुक्त अश्विन कुमार मुदगल, उपमहापौर दीपराज पार्डीकर आदी उपस्थित होते.

‘म्युझिकल फाऊंटन उभारणार’

शहराचा विकास करताना काही ठिकाणचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आले. अंबाझरीला स्वामी विवेकानंदाचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी म्युझिकल फाऊंटेन उभारणार आहे. याशिवाय तेलंगखेडी जागतिक दर्जाचे म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचे काम सुरू आहे. गुलजार यांचे संवाद आणि संगीतकार ए.आर. रहमान यांचे संगीत असलेले म्युझिकल फाऊंटेन आहे. जागतिक किर्तीचे ऑस्कर विजेते तीन कलावंत ते काम करीत आहे. त्यामुळे येत्या काळात जागतिक दर्जाचे म्युझिकल फाऊंटेन तयार होणार असल्याचे गडकरी म्हणाले.