तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मोकळा श्वास

नागपूर : टाळेबंदीच्या तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर  सार्वजनिक ठिकाणांसाठी शिथिलता जाहीर करण्यात आली. त्यानुसार शहरातील मदाने, जॉगिंग पार्क, उद्याने सुरू झाली. मात्र आज बुधवारी सकाळी पावसामुळे नागरिकांची निराशा झाली. आता पाच जूनपासून इतर सर्व बाजारपेठा एक दिवसाआड सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात शिथिलता दिली असली तरी नव्या नियमावली तयार केल्या आहेत. त्यानुसार शॉपिंग मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स वळगता इतर सर्व बाजारपेठा आता ५ जूनपासून एक दिवसाआड उघडणार आहेत. यामध्ये बर्डी येथील बाजरपेठेची एक बाजू म्हणजे पूर्व व उत्तर दिशेने असलेली सर्व दुकाने ५ तारखेला सुरू होतील. दुसऱ्या दिवशी दक्षिण-पश्चिम दिशेने असलेली दुकाने सुरू असतील. क्रीडाप्रेमींना आता मदानात आणि उद्यानात जाण्याची परवानगी दिली आहे. सकाळी ५ ते ७  दरम्यान मदानांवर धावण्यास, फिरण्यास, सायकिलग करण्यास  परवानगी दिली आहे.

 

नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सने व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये दुकानात ग्राहकांना

मास्क घालणे अनिवार्य असून आरोग्य अ‍ॅप सुरू ठेवणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय दुकानात येताना प्रवेशद्वारासमोर हात धुण्याची सोय, ग्राहकाचे तापमान मोजण्यासाठी यंत्र तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक,नाव तापमानाशेजारी लिहिणे, दुकानात सामाजिक अंतराचे पालन,

दिवसातून तीन तीन वेळा प्रतिष्ठान सॅनेटाईज करणे, ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू परत घेऊ नये, दुकानातील कर्मचाऱ्यांनी  हातमोजे घालणे आवश्यक, ट्रायल रुम बंद ठेवणे, धूम्रपान,तंबाखू, खर्रा खाण्यावर बंदी घालण्याचे कळवले आहे.