मोकळ्या जागेत व्यावसायिक स्टॉलला परवानगी; एक आठवडा नि:शुल्क देण्याचा निर्णय

प्रवासी मिळवण्यासाठी चालवलेल्या विविध अभिनव उपक्रमानुसार आता वाढदिवस व तत्सम कार्यक्रमासाठी मेट्रो भाडय़ाने देण्याचे पाऊल मेट्रोने उचलले आहे. त्यासोबतच मेट्रोच्या स्थानकांवरील मोकळ्या जागेत व्यावसायिक स्टॉल थाटण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

सध्या वर्धा आणि हिंगणा या दोन मार्गावर धावणाऱ्या मेट्रोला प्रवासी मिळत नसल्याने व्यवस्थापन चिंतित आहे. प्रवासी मेट्रोशी जुळावे म्हणून व्यवस्थापनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रमासाठी मेट्रो बोगी भाडय़ाने देण्याची घोषणा सोमवारी मेट्रोने केली होती. मात्र त्यापूर्वीच मेट्रो स्थानकावरची जागा व्यावसायिक स्टॉलसाठी एक आठवडा नि:शुल्क देण्याचा निर्णय झालेला आहे. आतापर्यंत एअरपोर्ट, बर्डी, सुभाषनगर, लोकमान्य नगर या स्थानकांवर व्यावसायिक स्टॉल लागले होते. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊथ स्थानकावर कन्व्हेन्शन सेंटर (सभागृह) बांधण्यात आले. ते सार्वजनिक कार्यक्रमासाठी देण्याचा महामेट्रोचा विचार आहे. १३ नोव्हेंबरला याच सभागृहात  मेट्रोने बांधलेल्या डबल डेकर पुलाच्या लोकार्पणाचा समारंभ झाला होता हे येथे उल्लेखनीय.

मेट्रोच्या सुविधांची नागरिकांना माहिती व्हावी म्हणून एअरपोर्ट स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालयही सुरू करण्यात आले आहे. यामुळे मेट्रो प्रकल्प प्रवासी सेवेऐवजी अन्य उपक्रमांमुळेच अधिक प्रसिद्धीच्या झोतात आहे.

यासंदर्भात महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व उपक्रम मेट्रोशी सर्वसामान्य नागरिक जुळावे, या हेतूने राबवले जात आहे. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवासी मिळण्याठी काही दिवस लागतातच.

प्रवासी मेट्रोकडे वळू लागले असतानाच ऐन उन्हाळ्यात टाळेबंदी लागली. त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सेवा बंद होती. त्याचा फटका बसला.

आम्ही तिकीट दर कमी केले, फीडर सेवा सुरू केली. लोक  मेट्रोकडे वळत असतानाच आता करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती पसरली आहे.

मेट्रोने नेमले अ‍ॅम्बेसिडर

मेट्रो सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, हे पटवून सांगण्यासाठी महामेट्रोने मेट्रो स्थानक परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींना अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्याशी महामेट्रोचे अधिकारी समन्वय साधतील.