आजपासून नवे नियम; मॉल्स, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहांना परवानगी

नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी टाळेबंदीचे निर्बंध काही अंशी पुन्हा शिथिल केले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणारी जीवनावश्यक वस्तूंसह इतरही वस्तूंची दुकाने आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर रेस्टॉरेंट मात्र रात्री दहापर्यंत सुरू राहतील. त्याचप्रमाणे यापूर्वी बंद असलेले मॉल्स, चित्रपटगृहे ,मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत. बाजारपेठेवरील शनिवार व रविवारची बंदीही  उठवण्यात आली आहे.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, आदी उपस्थित होते. त्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर राऊत यांनी याची माहिती दिली.

टाळेबंदीच्या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल. विशेषत: लग्न समारंभात गर्दी झाल्यास संबंधित मंगल कार्यालय संचालकावर दंड ठोठावला जाईल व पुढच्या काळासाठी हे कार्यालय बंद केले जाईल, असे राऊत म्हणाले. मधल्या काळात टाळेबंदीत शिथिलता दिल्यावर रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे सर्वानी नियमांचे पालन करावे, लहान मुले दुसऱ्या लाटेत बाधित झाले होते. त्यामुळे त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत धोका राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पावले उचलली आहे, असे राऊ त म्हणाले.

केंद्राने इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा

म्युकरमायकोसिस रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा आहे, केंद्र सरकारने त्याचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली. केंद्र  सरकारकडून हे इंजेक्शन राज्य सरकारकडे व तेथून जिल्ह्य़ांना पाठवले जाते. प्रत्येक जिल्ह्य़ांचा कोटा ठरलेला आहे. त्याप्रमाणे वाटप होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हे सुरू राहणार

– जीवनावश्यक वस्तूंची दुकाने – (स. ७ ते सायं. ५ पर्यंत)

– इतर वस्तूंची दुकाने (स. ७ ते सायं. पर्यंत)

– मॉल, चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स नाटय़गृहे (सायं. ५ पर्यंत ५० टक्के क्षमतेने)

– उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेत रात्री दहापर्यंत

– मद्याची दुकाने (सायं. ५ पर्यंत)

– बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट (रात्री १० पर्यंत)

– मांस विक्रीची दुकाने (सायं. ५ पर्यंत)

– क्रीडांगणे, उद्याने (स. ९ ते सायं. ५ व सायं. ५ ते रात्री ९ पर्यंत)

– वॉकिंग, सायकलिंग(स. ५ ते ९ व सायं. ५ ते रात्री ९)

– सरकारी कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सायं. ५पर्यंत

– सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सभागृहाच्या ५० टक्के किंवा १०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी.

– लग्न समारंभ- मंगल कार्यालयाच्या ५० टक्के क्षमतेत किंवा शंभर लोकांच्या उपस्थितीत

– अंत्यसंस्कार अधिकाधिक ५० लोकांना उपस्थित राहता येईल

– बैठका, निवडणुका, स्थानिक प्रशासन व स्थायी समिती बैठक, सहकारी मंडळ ऑनलाईन घेता येतील.

– बांधकामास परवानगी आहे

– जिम, सलून, पार्लर, स्पा सायं. ५ पर्यंत

-आंतरजिल्हा प्रवास, खाजगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्लय़ाच्या रेल्वेगाडय़ांना परवानगी.

हे बंद असेल

– शाळा, महाविद्यालये

– सर्व धार्मिक स्थळे

– सर्व जलतरण तलाव बंद

– राजकीय व धार्मिक कार्यक्रम