उच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना बाजारात जीवनरक्षक औषधांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांना जीवनरक्षक औषधांचा पुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका जिल्हा बार असोसिएशनचे (डीबीए) अध्यक्ष कमल सतुजा यांनी दाखल केली.

या याचिकेवर न्या. रवि देशपांडे आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, महापालिका यांना नोटीस बजावली असून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांनुसार करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे

अ‍ॅड. शशिकांत बोरकर आणि सुनील मिश्रा यांचा मृत्यू झाला. वाढता करोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता विलगीकरण वार्डाची पुरेशी संख्या नाही.

वेगवेगळ्या ठिकाणी चाचणी केल्यास निकालही वेगवेगळे मिळत आहेत. तसेच रुग्णालय व औषध बाजारात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा असून साथीचा आजार रोखण्यासाठी योग्य उपायोजना करण्यात यायला हव्यात, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.