News Flash

गणपतीच्या छोटय़ा मूर्तीचा यंदा तुटवडा

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीबाबत नागपूर महापालिकेने अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

५० टक्के आवक कमी

बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवरच आलेले असताना शहरातील विविध भागातील मूर्तीकारांकडे तयारीला वेग आला आहे. यंदा बाहेरगावावरून येणाऱ्या गणपतीच्या छोटय़ा मूर्तीची आवक ५० टक्के कमी झाल्यामुळे शहरात मूर्तीचा तुटवटा जाणवणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीबाबत नागपूर महापालिकेने अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. शहरात अडीच ते तीन लाखांच्या जवळपास गणेश मूतीर्ंची गरज असताना इतक्या मोठय़ा प्रमाणात मातीच्या मूर्ती मिळणे कठीण होणार आहे.

आबालवृद्धांपासून सर्वचजण विघ्नहर्त्यां गणपती उत्सवाच्या प्रतीक्षेत असून अनेक सार्वजनिक मंडळांनी मोठय़ा मूतीर्ंची शहरातील विविध भागातील मूर्तीकारांकडे आगाऊ मागणी केली असून त्यांचे काम सुरू झाले आहे. मात्र, घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये गणपतीच्या छोटय़ा मूर्तींची स्थापना केली जाते. यावेळी या मूर्तीचा तुटवडा जाणवणार असल्याचे सध्याचे शहरातील चित्र आहे. पंधरा दिवस गणेशोत्सवाला शिल्लक असताना शहरात एरवी गणपती मूतीर्ंची स्टॉल्स लावलेले असतात. नागपूर शहरात अमरावतीसह कोकणातून मोठय़ा प्रमाणात गणपतीच्या मूर्ती विक्रीला येत असतात.

अमरावतीमध्ये फैजरपुरा आणि अंबागेटजवळ गणपतीच्या छोटय़ा मूर्ती तयार करण्याचे कारखाने असून वर्षभर त्या ठिकाणी मूर्ती घडविण्याचे काम केले जाते. यावेळी अमरावती महापालिकेने यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्यास त्या जप्त करण्याचे निर्देश दिले. दिवाळीनंतर सुरू होणारे मूर्ती तयार करण्याचे काम फेब्रुवारीनंतर सुरू झाले. नागपूर शहरातील ८० टक्के विक्रेते अमरावतीवरून मूर्ती विक्रीसाठी घेऊन येतात आणि शहरात गणेश प्रदर्शन आयोजित करून त्यांची  विक्री करतात. मात्र, यावेळी अजूनही प्रदर्शन लागलेले नाही. शहरातील विक्रेत्यांना केवळ ५० ते १०० मूर्ती विक्रीसाठी दिल्या जात असल्यामुळे शहरात यावेळी मूर्ती टंचाई जाणवणार आहे. नागपूरमध्ये मातीच्या छोटय़ा मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत शहराला लागेल तेवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे शहरातील मूर्तीकारांचे म्हणणे आहे.

दरवर्षी शहरातील चितारओळीतील बहुतेक मूर्तीकारांकडे १०० ते १५० मूर्तीची निर्मिती होत असताना यावेळी ८० ते ९० मूर्तीची निर्मिती होणार असल्याचे मूर्तीकार प्रमोद सूर्यवंशी आणि राजेश मालवी यांनी सांगितले.  गणेश मंडळाची मागणी वाढत असताना त्या प्रमाणात मूर्तीची निर्मिती करणे शक्य नाही. शहरातील जुन्या व नावाजलेल्या मूर्तीकारांकडे नवीन पिढी या व्यवसायात पडू पाहात नाही.  त्यामुळे कामाला माणसे मिळत नाही. ज्या मूर्ती गेल्यावषीपर्यंत तीन हजारांना विकल्या जायच्या त्यांची किंमत यावेळी जवळपास दुप्पट म्हणजे सहा हजारांच्या जवळपास आहे. मूर्तीकाराला लागलेला खर्च भरून काढण्यासाठी मूर्तींच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गांधीबाग, तात्या टोपे नगर, सक्करदरा या भागात गणेश प्रदर्शन आयोजित केले जाते. दरवर्षी गणपतीच्या मूर्ती अमरावतीवरून विक्रीसाठी येतात. मात्र यावेळी केवळ १५०० मूर्ती विक्रीसाठी मिळाल्या आहेत. प्रत्येक विक्रेत्यांना यावेळी ५० टक्के मूर्ती विक्रीसाठी कमी दिल्या जात आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेण्यास नागरिक तयार नसतात आणि मातीच्या मूर्तीची आवक कमी असल्यामुळे यंदा मूर्तींची टंचाई जाणवणार आहे.

– कमलेश चौरसिया, गांधीबाग, गणेश प्रदर्शन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 1:35 am

Web Title: shortage of small idols of lord ganesh
Next Stories
1 ‘श्रद्धानंद’च्या  हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू
2 मूल्यांकन की अध्यापन?, प्राध्यापकांसमोर पेच
3 गाईंची विटंबना करणारा जिभकाटे अद्याप मोकळाच
Just Now!
X